मनोरंजन

१०.५२ सेकंदात माउली-पिस्टन जोडी ची झेप; तळेगावात प्रथमच छकडी स्पर्धेचा ऐतिहासिक थरार


१०.५२ सेकंदात माउली-पिस्टन जोडी ची झेप; तळेगावात प्रथमच छकडी स्पर्धेचा ऐतिहासिक थरार

तळेगाव दाभाडे :
शहराचे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त प्रथमच रंगलेल्या छकडी स्पर्धेने तळेगाव दाभाडेकरांना रोमांचित केले. पारंपरिक बैलगाडा संस्कृतीचा वेध घेणाऱ्या या स्पर्धेत शिवाजी महिपती टाकवे यांच्या ‘माउली-पिस्टन’ बैलजोडीने अवघ्या १०.५२ सेकंदांत धावपट्टी पार करत( घाटाचा राजा) प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १८० छकड्यांनी सहभाग नोंदवत मैदानात रंगत आणली. एकाच गटात पार पडलेल्या या स्पर्धेत दोन फेऱ्यांचा थरार पाहायला मिळाला. दुसऱ्या फेरीनंतर अंतिम निकाल जाहीर होताच विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

अंतिम फेरीत शिवाजी महिपती टाकवे व शिवन्या शेलार यांच्या बैलजोडीने वेग आणि समन्वयाचा सुरेख संगम साधत पहिला क्रमांक पटकावला. स्वप्निल तरस व अमोल वाघोले यांनी दमदार कामगिरी करत द्वितीय स्थान मिळवले. भैरवनाथ बैलगाडा संघटनेचे नंदूशेठ जाधव व सचिन काजळे यांनी तृतीय, नामदेव कोंडे व नवनाथ पडवळ यांनी चतुर्थ, तर उत्कर्ष कवडे व देवराम गायकवाड यांनी पाचव्या स्थानावर समाधान मानले.

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या छकडी स्पर्धेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी प्रत्येक धावीत उस्फूर्त जल्लोष करत स्पर्धकांचा उत्साह दुप्पट केला. वेग, ताकद आणि कौशल्याचा मिलाफ असलेल्या या स्पर्धेने पारंपरिक क्रीडा प्रकाराला नवसंजीवनी दिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चोख नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. सुरक्षिततेची काळजी, वेळेचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनातील अचूकता यामुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली.

तळेगाव दाभाडेच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा अनोखा क्रीडोत्सव पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *