टेक्नॉलॉजी

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक प्रकल्प मेमध्ये खुला होण्याची शक्यता: ९७.६० टक्के काम पूर्ण,


मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक प्रकल्प मेमध्ये खुला होण्याची शक्यता: ९७.६० टक्के काम पूर्ण,

लोनावळा :मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या मे महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्धार प्रकल्प प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. सध्या प्रकल्पाचे तब्बल ९७.६० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अत्याधुनिक दुव्यामुळे लोणावळा घाटातील कायमची वाहतूक कोंडी इतिहासजमा होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

‘मिसिंग लिंक’ हा केवळ मार्ग नाही, तर वेग, सुरक्षितता आणि सुलभतेचा संगम ठरणार आहे. उंच पुल, बोगदे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारलेला हा दुवा घाटातील वळणावळणांचा त्रास कमी करणार आहे. परिणामी वाहनचालकांना कमी वेळेत, कमी इंधनखर्चात आणि अधिक सुरक्षिततेसह प्रवास करता येणार आहे.

विशेषतः सुट्टीच्या दिवसांत आणि सणासुदीच्या काळात लोणावळा घाटात निर्माण होणाऱ्या वाहनरांगांचा मोठा प्रश्न या प्रकल्पामुळे सुटणार आहे. वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहिल्याने आपत्कालीन सेवांनाही जलद प्रतिसाद देणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रकल्प पूर्णतेकडे झेपावत असताना स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे प्रवासाचा चेहरामोहराच बदलणार असून हा दुवा राज्याच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *