ताज्या घडामोडीसामाजिक

नव्या डांबरी रस्त्यावर वेगाचा धोका; शाळा चौक–गणपती चौकात स्पीड ब्रेकरची तातडीची गरज.


.नव्या डांबरी रस्त्यावर वेगाचा धोका; शाळा चौक–गणपती चौकात स्पीड ब्रेकरची तातडीची गरज.

तळेगाव दाभाडे :
नगरपरिषदेच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरातील जिजामाता चौक, शाळा चौक, गणपती चौक ते भेगडे आळी या महत्त्वाच्या मार्गाचे नुकतेच डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. रस्ता चांगल्या दर्जाचा व गुळगुळीत झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असले, तरी याच रस्त्यावरून वाहनांचा वेग लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शाळा चौकापासून गणपती चौकापर्यंतचा रस्ता हा तीव्र उताराचा आहे. या उतारावरून भरधाव वेगाने येणारी वाहने थेट गणपती चौकात दाखल होत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. गणपती चौक हा चारही बाजूंनी वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा असल्याने येथे दुचाकी, चारचाकी, रिक्षा यांच्यासह पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. याच परिसरात दुकाने व वसाहती असल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात रस्ता ओलांडतात.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता उत्तम झाल्यामुळे काही वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करून वाहने चालवत आहेत. परिणामी पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करताना तसेच चौकात वळण घेताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळा चौक ते गणपती चौक या दरम्यान तसेच गणपती चौक परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

यासोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर स्पष्ट पांढरे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग), आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपरिषदेने वेळीच सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्यास भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *