राजकीय

मावळ बाजार समितीत सत्ताबॉम्ब’:आमदार शेळकेंचा आदेश धुडकावला? ९ राजीनामे, ४ जण अजूनही ‘वेट अँड वॉच’मध्ये


मावळ बाजार समितीत सत्ताबॉम्ब’:आमदार शेळकेंचा आदेश धुडकावला? ९ राजीनामे, ४ जण अजूनही ‘वेट अँड वॉच’मध्ये

मावळ : मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तासमीकरणांचा स्फोट होताच तालुक्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. संख्याबळाने मजबूत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून सत्तेची सूत्रे निसटली आणि केवळ पाच संचालकांच्या बळावर भाजपने सभापतीपद पटकावत गेम’ फिरवला. या धक्क्याने संतप्त झालेले आमदार सुनील शेळके यांनी आता थेट अॅक्शन मोड मध्ये जात पक्षांतर्गत शिस्तीचा बडगा उगारला आहे.

सभापतीपदाच्या निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर आमदार सुनील शेळके यांनी पक्षाच्या सर्व १३ संचालकांना एकाच फटक्यात राजीनामे देण्याचा आदेश देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. राजीनामा द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा.असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. मात्र, या आदेशालाही पूर्ण प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटातच मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे.

पक्षाच्या १३ पैकी ९ संचालकांनी शेळकेंच्या आदेशाला मान देत तातडीने राजीनामे सादर केले. यात सुप्रिया मालपोटे, अंजली जांभुळकर, भरत टकले, अमोल मोकाशी, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विक्रम कलवडे, नथुराम वाघमारे आणि विलास मालपोटे यांचा समावेश आहे. मात्र उर्वरित चार संचालकांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत शेळकेंच्या आदेशालाच आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे. संभाजी शिंदे, नामदेव शेलार, विलास मानकर आणि शंकर उर्फ बाळासाहेब वाजे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने राजकीय संभ्रम अधिकच वाढला आहे.

दरम्यान, भाजपने कमी संख्याबळातही सत्तेवर झेंडा रोवल्याने हा राजकीय मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. सभापती सुभाषराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी असवले, साईनाथ मांडेकर, नामदेव कोंडे आणि बंडू घोजगे हे सदस्य सध्या आघाडीवर असून त्यांनी सत्ता स्थिर ठेवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मावळ बाजार समितीत एकूण १८ संचालकांची संख्या असताना ९ जणांनी राजीनामे दिल्याने सध्या समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. हे राजीनामे मंजूर झाल्यास समितीचा कोरम अपुरा ठरणार असून मंडळ बरखास्त होण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी, समितीवर प्रशासक नेमण्याचा पर्यायही पुढे येऊ शकतो.

तथापि, या सत्तानाट्यात अजूनही ट्विस्ट ची शक्यता कायम आहे. राजीनामा दिलेल्या संचालकांपैकी एखाद्याने माघार घेतली, किंवा उर्वरित चार संचालकांनी शेळकेंच्या बाजूने कल दर्शवला, तर संपूर्ण राजकीय पट पुन्हा एकदा उलथापालथ होऊ शकतो.

एकंदर, मावळ बाजार समितीतील ही घडामोड केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरली आहे. शेळकेंच्या आक्रमक भूमिकेला उर्वरित संचालक कसा प्रतिसाद देतात आणि पुढील काही दिवसांत कोणते नवे राजकीय समीकरण आकार घेते, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *