तळेगावातील श्री शिवशंभू स्मारक संस्थेकडून अनियंत्रित व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी
तळेगावातील श्री शिवशंभू स्मारक संस्थेकडून अनियंत्रित व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे येथील श्री शिवशंभू स्मारक संस्था च्या वतीने श्री शिवशंभू तीर्थ स्मारक परिसरातील वाढत्या अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांविरोधात प्रशासनाकडे ठोस आणि तातडीच्या कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले आहे. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांना हे निवेदन देण्यात आले.
तळेगाव शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात भर घालणारे छत्रपती शिव शंभू महाराजांचे एकत्रित शिल्प असलेले श्री शिवशंभू तीर्थ स्मारक अवघ्या चार महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून, अल्पावधीतच हे स्थळ नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ होत आहे.
मात्र, या स्मारकाच्या अवतीभवती सार्वजनिक जागांवर वाढलेले अतिक्रमण आणि खाजगी जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, शेड व हातगाड्यांमुळे परिसराचा शिस्तबद्धपणा धोक्यात आला आहे. या व्यावसायिकांमुळे मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत असून, ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहन पार्किंग केल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, परिसराचे सौंदर्य आणि स्वच्छता ढासळत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
याशिवाय, स्मारकाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी परिसरात मांसाहारी खाद्यपदार्थ, मद्य तसेच गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट आणि बिडी यांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्मारकाच्या किमान १०० मीटर परिसरात तीनही बाजूंनी अतिक्रमण करणाऱ्या सर्व स्थायी व अस्थायी व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. यामध्ये नियमबाह्य दुकाने, टपऱ्या, शेड, पथारी आणि हातगाडी व्यावसायिकांचा समावेश आहे.
ही मागणी तळेगाव दाभाडे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देणारी आणि नागरी वैभव वृद्धिंगत करणारी ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत या मागणीची तातडीने दखल घेऊन योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल, अशी आशा व्यक्त करत संस्थेच्या सर्व सदस्यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी श्री शिवशंभू स्मारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भेगडे(पाटील) विनीत भेगडे. संजय बाविस्कर. रवींद्र काळोखे उपस्थित होते.





