गोल्डन रोटरीचा पुढाकार: ३५६ विद्यार्थ्यांचे HPV लसीकरण यशस्वी
गोल्डन रोटरीचा पुढाकार: ३५६ विद्यार्थ्यांचे HPV लसीकरण यशस्वी
तळेगाव दाभाडे : समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ३५६ विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
ही लसीकरण मोहीम शहरातील विविध शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आली. बालविकास विद्यालय येथे सर्वाधिक १४१ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली, तर ईडन हायस्कूलमध्ये ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आदर्श विद्या मंदिरमध्ये ४९, अॅड. पु. वा. परांजपे विद्यालयात ५६, वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्र. ५ मध्ये ४१ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. हॅचिंग स्कूलमध्ये ९, सर सेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक शाळा क्र. ४ मध्ये ७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्र. ३ आणि श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र. ६ येथे प्रत्येकी १९ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले. कांतीलाल विद्यालय व माउंट सेंट अॅन हायस्कूल येथे प्रत्येकी २ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली.
या संपूर्ण मोहिमेदरम्यान एकही विद्यार्थ्याला कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही, ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली. त्यामुळे पालकांमध्ये लसीकरणाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. HPV लस ही विशेषतः गर्भाशयमुख कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देणारी असल्याने, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम दूरदृष्टीचा निर्णय मानला जात आहे.
या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मेडिकल डायरेक्टर डॉ. सौरभ मेहता आणि अध्यक्ष रो. संतोष परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी समन्वय साधत हा उपक्रम यशस्वी केला. लसीकरण प्रक्रियेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे, सिरम इन्स्टिट्यूट, पुणे आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उल्लेखनीय उपक्रमामुळे रोटरी क्लब ऑफ गोल्डनचे सर्वत्र कौतुक होत असून, आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. आज घेतलेले लसीकरण उद्याच्या पिढीला कर्करोगमुक्त जीवन देईल, हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे देण्यात आला आहे.





