अनधिकृत बॅनर काढण्याचा दिखावा; तळेगावातील कारवाईवर प्रश्नचिन्ह
अनधिकृत बॅनर काढण्याचा दिखावा; तळेगावातील कारवाईवर प्रश्नचिन्ह
तळेगाव दाभाडे : शहराच्या सौंदर्यावर गदा आणणाऱ्या अनाधिकृत बॅनरप्रश्नी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सर्वत्र कारवाईची मागणी जोर धरत आहे. विशेषतः तळेगाव स्टेशन चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक तसेच शहरातील प्रत्येक गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी बॅनर लावण्यात आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे आरोग्य सभापती निखिल भगत यांनी संपूर्ण शहराचा दौरा करून सर्वंकष कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दोन दिवसांपूर्वी मराठा क्रांती चौकात काही अनाधिकृत बॅनर हटविण्यात आले होते. मात्र, ही कारवाई केवळ औपचारिकतेपुरतीच मर्यादित राहिल्याची टीका आता होत आहे. कारण स्टेशन परिसर व गावभागात आजही अनाधिकृत बॅनर जसाच्या तसे दिसून येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कारवाई झाली, पण ती सर्वत्र का नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अनाधिकृत बॅनरमुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये तळेगावबाबत नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या मते, या बॅनरमुळे केवळ दृश्य प्रदूषणच वाढत नाही, तर शहराची ओळखही मलिन होत आहे. सुंदर तळेगाव ही ओळख आता बॅनरांनी व्यापलेले तळेगाव अशी होत चालल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, अनेक ठिकाणी विनापरवानगी बॅनर लोकप्रतिनिधींकडूनच लावले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जर लोकप्रतिनिधीच नियम मोडत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, बॅनर संस्कृतीला अधिक खतपाणी मिळत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने एकदाच नव्हे तर सातत्याने मोहीम राबवून सर्व अनाधिकृत बॅनर हटवणे गरजेचे आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाईही करावी, अशी मागणी होत आहे.
आता सर्वांचे लक्ष आरोग्य सभापती निखिल भगत यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. ते संपूर्ण तळेगाव शहराचा फेरफटका मारून सर्वत्र समान कारवाई करतील का? की ही मोहीम केवळ दिखाव्या पुरतीच राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





