सह्याद्रीच्या कड्यावरून जागतिक झेंडा फडकला:मिसिंग लिंक च्या महा बोगद्याची गिनिज बुक मध्ये दिमाखात नोंद
सह्याद्रीच्या कड्यावरून जागतिक झेंडा फडकला:मिसिंग लिंक च्या महा बोगद्याची गिनिज बुक मध्ये दिमाखात नोंद
लोनावळा – महाराष्ट्र दिनाच्या सुवर्णक्षणी सह्याद्रीच्या कुशीतून एक अभिमानाचा घोष दुमदुमला. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वरील मिसिंग लिंक प्रकल्पातील भव्य बोगद्याने थेट जागतिक विक्रमांच्या शिखरावर झेप घेत, गिनिथ बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा अशी दैदिप्यमान नोंद कोरली. २२.३३ मीटर रुंदीचा हा महाबोगदा अभियांत्रिकी सामर्थ्याचा सह्याद्री-स्वाक्षरी ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या या प्रकल्पाने पहिल्याच टप्प्यात जागतिक पातळीवर मानाचा तुरा मिळवला. गिनिज बुक च्या प्रतिनिधींनी विक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट उसळला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले. आमदार सुनील शेळके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या आणि अभियंत्यांच्या समन्वयातून घडलेली ही कामगिरी राज्याच्या विकासदृष्टीला नवे पंख देणारी ठरली.
विशेष म्हणजे, एम एस आर डी सी आणि नवयुगा कंपनीच्या अभियंत्यांनी या बोगद्याच्या बांधकामात तांत्रिक कौशल्याचा कळस गाठला. अत्याधुनिक यंत्रसामग्री, अचूक नियोजन आणि वेळेची काटेकोर शिस्त यांचा संगम या प्रकल्पात पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान अधिकाऱ्यांनी बोगद्याच्या रचना, सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक सुलभतेविषयी सविस्तर माहिती दिली.
सह्याद्रीच्या डोंगररांगांना छेद देत उभारलेला हा महाबोगदा केवळ प्रवासाची वेळ कमी करणारा नाही, तर महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी क्षमतेचा जागतिक डंका वाजवणारा ठरला आहे. मिसिंग लिंक चा हा दुवा आता केवळ रस्त्यांचा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा नवा महामार्ग बनला आहे.





