राजकीय

महिला शक्तीचा शिवशाही बिगुल; उषामाई कांबळे प्रदेशाध्यक्ष, महानंदाताई चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान


महिला शक्तीचा शिवशाही बिगुल; उषामाई कांबळे प्रदेशाध्यक्ष, महानंदाताई चव्हाण उपाध्यक्षपदी विराजमान

पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्राच्या सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रात वेगाने पाय रोवणाऱ्या शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडीला नवे नेतृत्व लाभले असून प्रदेशाध्यक्षपदी उषामाई भिमराव कांबळे तर उपाध्यक्ष (प्रभारी) पदावर महानंदाताई सोपान चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश मुख्य सचिव कल्पना मोरे-दाखले यांच्या नेतृत्वाखाली ही निवड जाहीर करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

महिला सक्षमीकरणाच्या लढ्यात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या उषामाई कांबळे आणि महानंदाताई चव्हाण या दोघीही सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, लढाऊ आणि संघटनक्षम नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. व्यापारी महिलांचे प्रश्न, महिला सुरक्षेचे मुद्दे आणि हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी सातत्याने काम केले असल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले.

महिला आघाडीच्या माध्यमातून शिवशाहीचा विचार घराघरात पोहोचवण्याची ताकद या दोन्ही नेत्या निर्माण करतील. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात महिला संघटन अधिक भक्कम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल,असा विश्वास युवराज दाखले यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर उषामाई कांबळे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, संस्थापक अध्यक्ष युवराज दादा यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी जबाबदारी आहे. आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांसारख्या महापुरुषांच्या विचारांवर चालत महिला आघाडीची भक्कम फळी उभी करू.

महानंदाताई चव्हाण यांनीही संघटनेच्या कार्याचा विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांच्या सुरक्षेसाठी, स्वसंरक्षणासाठी आणि स्वावलंबनासाठी संघटना रस्त्यावर उतरून काम करेल. व्यापारी भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल,असे त्या म्हणाल्या.

महिला आघाडीच्या आगामी कार्ययोजनेत प्रत्येक जिल्हा आणि प्रभागात महिला संपर्क प्रमुख नेमणे, व्यापारी महिलांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करणे, महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बचत गट आणि महिला उद्योजकतेला चालना देणे अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. तसेच समाजप्रबोधनासाठी विविध जनजागृती मोहिमा राबवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, या नियुक्त्यांमुळे शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडीला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. प्रदेश मुख्य सचिव कल्पना मोरे-दाखले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पिंपरी-चिंचवड शहराची संपूर्ण महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही युवराज दाखले यांनी दिली.

शहरातील सामाजिक आणि व्यापारी वर्तुळात या नियुक्त्यांचे स्वागत होत असून महिला संघटनांच्या राजकीय-सामाजिक समीकरणांना यामुळे नवी धार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *