महत्त्वाचे

मावळच्या जलवैभवाची ऐतिहासिक साक्ष: बऊरच्या शिलालेखांतून उलगडला इतिहास तलाव आणि बारवेच्या निर्मितीची अडीचशे वर्षांपूर्वीची नोंद उजेडात


मावळच्या जलवैभवाची ऐतिहासिक साक्ष: बऊरच्या शिलालेखांतून उलगडला इतिहास तलाव आणि बारवेच्या निर्मितीची अडीचशे वर्षांपूर्वीची नोंद उजेडात

 

कामशेत : मावळ तालुक्यातील मौजे बऊर गावातील ऐतिहासिक तलाव आणि बारवेवरील शिलालेखांच्या अभ्यासातून तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीच्या जलव्यवस्थापनाचा महत्त्वपूर्ण इतिहास समोर आला आहे. तलावाच्या भिंतीवर दोन ठिकाणी आणि बारवेवर कोरलेल्या चार ओळींच्या देवनागरी शिलालेखांमुळे या जलस्रोतांच्या निर्मितीचा कालखंड, त्यामागील प्रेरणा आणि त्यांचे निर्माते यांचा ऐतिहासिक उलगडा झाला आहे.

इतिहास अभ्यासक दीपक पटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोसर घराण्याचे मूळ गाव रत्नागिरीजवळील डोकमळे-नेवर हे आहे. दादो कान्हो ठोसर हे रसाळगडचे सभासद होते. किल्ला आंग्रे यांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या सेवेत वाकनिसीचे काम स्वीकारले. त्यांनी तळेगाव दाभाडे तसेच पवन मावळातील बऊर येथे वास्तव्यास येत शेती आणि वस्ती उभारली. पुढे त्यांचे पुत्र कृष्णाजी यांनी पुण्यात पेशव्यांच्या सेवेत काम पाहिले. त्यांचा मुलगा बाळाजी कृष्ण ठोसर हे नारायणराव आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या दरबारातील मान्यवर व्यक्ती होते. त्यांच्या कार्याची दखल घेत बऊर गाव इनाम म्हणून देण्यात आल्याची नोंद इतिहासात आढळते.

तलावावरील पहिल्या शिलालेखानुसार शालिवाहन शक १६९६ (१३ मार्च १७७४) रोजी बाळाजी कृष्ण ठोसर यांनी तलावाच्या बांधकामास प्रारंभ केला. त्यानंतर शालिवाहन शक १६९७ (३१ मार्च १७७५) रोजी तलावाचे बांधकाम पूर्णत्वास गेल्याची नोंद दुसऱ्या शिलालेखात आहे. या नोंदीमुळे गावाच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नियोजनबद्ध जलस्रोत उभारण्यात आल्याचे स्पष्ट होते.

तलावानंतर मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या नंदा प्रकारच्या भव्य बारवेवरील शिलालेखातही महत्त्वपूर्ण माहिती नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार श्री वेंकटेशावरील अखंड श्रद्धेतून इनामदार बाळाजी कृष्ण ठोसर यांनी ३००१ रुपये खर्च करून ही बारव बांधल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखामुळे त्या काळातील लोकहितवादी दृष्टी, जलसंधारणाची दूरदृष्टी आणि धार्मिक श्रद्धेचा सुंदर संगम अधोरेखित होतो.

शिलालेख वाचक अनिल दुशाणे म्हणाले, बऊर येथील तलाव आणि बारव या अठराव्या शतकातील जलस्थापत्याचा महत्त्वपूर्ण वारसा आहेत. बाळाजी कृष्ण ठोसर यांनी प्रथम तलाव उभारून गावासाठी पाण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर अधिक स्थिर व सुरक्षित जलस्रोत म्हणून भव्य बारव बांधली. या शिलालेखांतून त्यांची श्री वेंकटेशावरील भक्ती, लोकहिताची भावना आणि समाजकल्याणाची व्यापक दृष्टी स्पष्टपणे दिसून येते.

बऊरमधील हे शिलालेख केवळ ऐतिहासिक नोंदी नसून, मावळच्या समृद्ध जलसंस्कृतीचे आणि दूरदृष्टी असलेल्या पूर्वजांच्या लोककल्याणकारी कार्याचे जिवंत पुरावे असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *