ताज्या घडामोडी

विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडला ऐतिहासिक तोफगोळा:दीपोत्सवाच्या प्रकाशात इतिहासाचे नवे रहस्य; एकाच परिसरात सात वर्षांत सात तोफगोळ्यांचा शोध, शास्त्रोक्त उत्खननाची मागणी


विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडला ऐतिहासिक तोफगोळा:दीपोत्सवाच्या प्रकाशात इतिहासाचे नवे रहस्य; एकाच परिसरात सात वर्षांत सात तोफगोळ्यांचा शोध, शास्त्रोक्त उत्खननाची मागणी

 

लोणावळा : दिवाळीच्या दीपोत्सवाने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिर परिसर उजळून निघाला असतानाच गडाच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारा आणखी एक महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. किल्ल्यावरील जुन्या दारूगोळा कोठाराजवळ जमिनीत अर्धवट गाडलेला ऐतिहासिक तोफगोळा आढळल्याने इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वीही अनेक तोफगोळे सापडले असून, विसापूरच्या इतिहासातील दडलेली पाने उलगडण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंचाच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त किल्ल्यावरील शिवमंदिरात भव्य दीपोत्सव साजरा केला जातो. यंदाही प्रथम शिवपिंडीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात दीपप्रज्वलन करून भक्तिमय वातावरणात दीपोत्सव साजरा झाला.

यावेळी गडभ्रमंतीदरम्यान मंचाचे कार्याध्यक्ष सागर कुंभार यांना दारूगोळा कोठाराजवळ जमिनीतून वर आलेला तोफगोळा दिसला. तो बाहेर काढल्यानंतर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी सुभाष दहिभाते, मच्छिंद्र वाघमारे, रोहित नगीने व हेमंत वाघमारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये तीन, २०१९ मध्ये दोन, २०२४ मध्ये एक आणि २०२६ मध्ये पुन्हा एक असे एकूण सात तोफगोळे मंचाच्या कार्यकर्त्यांना याच परिसरात आढळले आहेत. या भागाचे शास्त्रोक्त उत्खनन केल्यास आणखी ऐतिहासिक अवशेष मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक डॉ. सचिन जोशी यांनी हे तोफगोळे ‘कुल्फी तोफगोळे’ प्रकारातील असल्याचे सांगितले. तोफेत दारू भरून वात पेटवून हे गोळे डागले जात असत. या तोफगोळ्याचे वजन पाच किलोपेक्षा अधिक आहे.

इतिहास मातीखाली गाडून ठेवायचा की संशोधनातून उजेडात आणायचा? हा प्रश्न आता पुरातत्त्व विभागासमोर उभा राहिला आहे. गडावरील भग्न राजवाडे, जलकुंड आणि अन्य ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासह शास्त्रोक्त उत्खननाची मागणी मंचाने केली आहे.

दीपोत्सवाचे नियोजन सचिन टेकवडे, सागर कुंभार, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, अनिकेत आंबेकर, विशाल शिंदे व ऋषिकेश कडू यांनी केले. यावेळी पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *