मावळ तालुक्यात गांजा विक्रीचे जाळे फोफावले; छोट्या विक्रेत्यांवर कारवाई पण खरा मास्टरमाईंड अजूनही मोकाट?:औद्योगिक विकासाच्या झगमगाटामागे अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांचे सावट; पोलिसांच्या कारवायांनंतरही गांजा विक्री थांबत नसल्याने नागरिकांचा संतप्त सवाल
मावळ तालुक्यात गांजा विक्रीचे जाळे फोफावले; छोट्या विक्रेत्यांवर कारवाई पण खरा मास्टरमाईंड अजूनही मोकाट?:औद्योगिक विकासाच्या झगमगाटामागे अमली पदार्थांच्या अवैध धंद्यांचे सावट; पोलिसांच्या कारवायांनंतरही गांजा विक्री थांबत नसल्याने नागरिकांचा संतप्त सवाल
मावळ : औद्योगिक प्रगती, पर्यटन व्यवसाय आणि शैक्षणिक विस्तारामुळे राज्याच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मावळ तालुक्यात गांजाच्या अवैध विक्रीने गंभीर स्वरूप धारण केल्याचे चित्र समोर येत आहे. विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या मावळच्या तरुणाईभोवती अमली पदार्थांच्या विळख्याचे सावट गडद होत असताना या अवैध व्यवसायाच्या मुळाशी असलेल्या सूत्रधारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
लोणावळा-खंडाळा पर्यटन पट्टा, तळेगाव दाभाडे, वडगाव, कामशेत, सोमाटणे, एमआयडीसी परिसर तसेच ग्रामीण भागात गांजा विक्रीचे जाळे विस्तारत असल्याबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात रोजगारासाठी येणारे कामगार, शिक्षणासाठी दाखल होणारे विद्यार्थी आणि स्थानिक तरुणाई या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची सहज उपलब्धता सामाजिक चिंतेचा विषय बनली आहे.
विशेष म्हणजे, मावळ तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिसांकडून गांजा विक्रीप्रकरणी कारवाया केल्या जात असल्याचे वृत्त वेळोवेळी समोर येते. मात्र, या कारवायांनंतरही अवैध विक्रीचे सत्र थांबत नसेल, तर या कारवायांची परिणामकारकता नेमकी किती? केवळ किरकोळ विक्रेत्यांना पकडून या व्यवसायाचे समूळ उच्चाटन होणार आहे का? विक्रेत्यांना गांजाचा पुरवठा करणारी साखळी कोणती? आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
या व्यवसायामागील खरा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे, याचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अद्याप यश का आलेले नाही? छोट्या विक्रेत्यांवर कारवाई होते; मग पडद्यामागून संपूर्ण यंत्रणा चालवणाऱ्यांपर्यंत तपास का पोहोचत नाही? या अवैध व्यवसायाला कोणाचे पाठबळ आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
पोलिस प्रशासनाने केवळ जप्ती आणि अटक यापुरते तपास मर्यादित न ठेवता पुरवठादार, आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण वितरण साखळी उघड करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
मावळच्या तरुणांचे भविष्य धोक्यात येत असताना प्रशासन आणखी किती काळ कारवायांच्या आकडेवारीवर समाधान मानणार? गांजाच्या अवैध साम्राज्याचा खरा मास्टरमाईंड जनतेसमोर कधी येणार, हा मावळकरांचा थेट सवाल आहे.





