कामशेत ग्रामपंचायतीचा कारभार की नागरिकांच्या जीवाशी खेळ? महामार्गालगत कचरा जाळण्याचा संतापजनक प्रकार!
कामशेत ग्रामपंचायतीचा कारभार की नागरिकांच्या जीवाशी खेळ? महामार्गालगत कचरा जाळण्याचा संतापजनक प्रकार!
कामशेत(मावळ) : कामशेत ग्रामपंचायतीच्या निष्काळजी कारभाराचा धूर आता थेट महामार्गावर पसरू लागला असून, कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कामशेत खिंड परिसरात कामशेतमधून संकलित केलेला कचरा आणून टाकला जातो आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याला आग लावली जाते या कचऱ्याच्या धुराचे लोट थेट महामार्गावर पसरत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक धुराचे साम्राज्य निर्माण होत असून, एखाद्या क्षणाची चूक भीषण अपघाताला निमंत्रण देऊ शकते. मात्र, या संभाव्य धोक्याची जाणीव कामशेत ग्रामपंचायतीला आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. केवळ वाहनचालकच नव्हे, तर परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधी आणि धुराचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, या समस्येबाबत प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तरीही परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही. उलट ग्रामपंचायतीची कचरा संकलन करणारी वाहनेच या ठिकाणी कचरा आणून टाकत आहे. काही दिवसांपूर्वीही याच ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आली होती. आता पुन्हा तोच प्रकार सुरू असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कचरा उचलणे म्हणजे तो दुसऱ्या ठिकाणी फेकणे आणि पेटवून देणे नव्हे! कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मग ही जबाबदारी पार पाडण्याऐवजी महामार्गालगत धुराचे संकट निर्माण करण्याचा प्रकार का सुरू आहे?
ग्रामपंचायतीने तातडीने या ठिकाणी कचरा टाकणे आणि जाळणे बंद करावे, संबंधित प्रकाराची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि कचऱ्याची कायमस्वरूपी शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी. अन्यथा एखादा भीषण अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.





