भटकी कुत्री हुसकावण्याचे नवे फर्मान .शिक्षण क्षेत्रात संताप
भटकी कुत्री हुसकावण्याचे नवे फर्मान .शिक्षण क्षेत्रात संताप
तळेगाव दाभाडे:
राज्यातील शिक्षक आधीच शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली भरडले जात असताना आता थेट शालेय परिसरातील भटक्या कुत्र्यांची जबाबदारीही त्यांच्या गळ्यात टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करून शाळेच्या स्वच्छतेसह भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अध्यापन सोडून जनगणना, निवडणूक, कोविड काळातील बंदोबस्त, दारूच्या दुकानाबाहेरील गर्दी नियंत्रण अशी असंख्य कामे शिक्षकांकडून करून घेतली गेली. आता प्रशासनाच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी कुत्र्यांचा प्रश्नही शिक्षकांवर ढकलण्यात येत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. हे सरकार आम्हाला उद्या बिबट्यांना, तर परवा मगरींनाही हुसकावायला सांगेल का? असा संतप्त सवाल तळेगावातील ज्येष्ठ मुख्याध्यापिका वर्षा थोरात यांनी उपस्थित केला आहे.
शालेय परिसर स्वच्छता, भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण व त्यांचा बंदोबस्त ही महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांची थेट जबाबदारी असताना प्रशासन हात वर करून शिक्षकांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. वर्गात मुलांना ज्ञान देण्याऐवजी शिक्षकांना कुत्र्यांच्या मागे धावायला लावण्याचा हा निर्णय म्हणजे शिक्षण व्यवस्थेची थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या आदेशामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान धुळीस मिळत असून अध्यापनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होणार आहे. राज्यातील सर्व शिक्षक संघटना या निर्णयाविरोधात एकवटल्या असून आदेश तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षकांना सर्वच प्रश्नांवर उपाय म्हणून वापरण्याची शासनाची सवय आता धोक्याच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचे मत व्यक्त होत आहे.





