तो गेला पण भेगडे आळी उभी राहिली
तो गेला पण भेगडे आळी उभी राहिली
तळेगाव दाभाडे :
“सगे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील…” कविवर्य भा. रा. तांबे यांच्या या ओळी अनेक वेळा वास्तवाचे कटू सत्य मांडतात. मृत्यू झाल्यावर हळहळ व्यक्त होते, अश्रू वाहतात आणि आयुष्य पुन्हा आपापल्या वाटेने पुढे सरकते. मात्र, या वास्तवाला छेद देत तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळीतील नागरिकांनी माणुसकीचा अपवाद घडवून आणला आहे. एका कुटुंबाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांवर समाजाने मायेची फुंकर घातली आहे.
भेगडे आळीतील सुमित सुरेश भेगडे (वय ३६) यांचे कर्करोगासारख्या असाध्य आजाराने निधन झाले. सुमित हा आई-वडिलांचा एकुलता एक आधारस्तंभ. उपचारांच्या काळात आयुष्याची पुंजी खर्ची पडली आणि अखेरीस मृत्यूने त्याला हिरावून नेले. सुमितच्या पश्चात वृद्ध आई-वडील, तरुण पत्नी आणि अवघा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा रायबा असा परिवार मागे राहिला. वडिलांच्या छायेत वाढायचे स्वप्न रायबाच्या नशिबी राहिले नाही.
सुमितच्या जाण्याने घरातील दिवा विझला, आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला. ही परिस्थिती ओळखून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांनी समाजाला साद घातली. ही साद केवळ मदतीची नव्हे, तर माणुसकीची होती—आणि त्या सादेला समाजाने भरभरून प्रतिसाद दिला.
नगरसेवक संतोष भेगडे यांनी पुढाकार घेत रायबा या चिमुकल्याच्या शैक्षणिक दत्तक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. ही घोषणा केवळ शब्दांची नव्हे, तर भविष्य घडविण्याची हमी ठरली. समाजातून अल्पावधीतच तीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. ही रक्कम तात्पुरत्या खर्चासाठी न वापरता, कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आली.
या मदतीच्या प्रवासात अनेक हृदयस्पर्शी प्रसंग घडले. काही दानशूरांनी मदत दिली, मात्र “नाव नको, प्रसिद्धी नको” असे सांगत खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडवले. ठेवीची पावती देताना छायाचित्र घेण्यासाठी आलेले छायाचित्रकार अंकुश दाभाडे यांनी छायाचित्रणाचे कोणतेही शुल्क न घेता उलट स्वतः आर्थिक मदत दिली. असे अनेक हात पुढे आल्याने काहीच दिवसांत निधी उभा राहिला.
सुमितचे वडील सुरेश भेगडे हे तळेगावमधील ईगल फ्लास्क कंपनीत नोकरी करत होते. मात्र सुमारे १५ वर्षांपूर्वी कंपनी बंद पडल्याने नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी मिळेल ते काम केले, घरच्या शेतीवर आणि सुमितच्या रिक्षावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. सुमितच्या निधनाने हा आधारही निघून गेला.
या कठीण क्षणी समाजाने दिलेल्या आधारामुळे सुरेश भेगडे भावूक झाले. माझा मुलगा गेला, पण समाजाने मला पुन्हा उभं केलं, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भेगडे आळीने दाखवलेली ही माणुसकी आजच्या संवेदनाहीन काळात एक जिवंत साक्ष आहे दुःख संपत नाही, पण माणूस माणसासाठी उभा राहिला तर वेदनाही थोड्या हलक्या होतात.





