छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने गुलामगिरीच्या अंधाराला छेद . इतिहास अभ्यासक शुभम मोटे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने गुलामगिरीच्या अंधाराला छेद . इतिहास अभ्यासक शुभम मोटे यांचे प्रतिपादन
तळेगाव दाभाडे :
महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या स्वाभिमानाच्या लढ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा निर्णायक टप्पा ठरला. परकीय सत्तेच्या जोखडाला थेट आव्हान देत स्वराज्याच्या धगधगत्या ज्योतीला नवी दिशा देण्याचे कार्य संभाजी महाराजांनी केले. त्यांच्या राज्याभिषेकामुळे भारतीय समाजाला गुलामगिरीचे सावट दूर करण्याची मानसिक व राजकीय ताकद मिळाली, असे ठाम प्रतिपादन इतिहास अभ्यासक शुभम नंदकुमार मोटे यांनी केले.
शहरातील श्री शिवशंभू तीर्थ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन झानेश्वर टेकवडे होते. यावेळी श्रीमंत उमाराजे दाभाडे, श्रीमंत याज्ञीसेनीराजे दाभाडे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक शिवाजीराव आगळे, चिराग खांडगे, विनोद भेगडे, सागर बोडके, शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील, कोषाध्यक्ष संजय बावीसकर, विजय काळोखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार रेशमा फडतरे, पत्रकार जगन्नाथ काळे, पत्रकार गणेश भेगडे तसेच श्री शिवशंभू तीर्थ समितीचे पदाधिकारी व असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भगवा ध्वज पूजन, ध्वजारोहण व वंदनाने झाली. त्यानंतर श्री शिवशंभू मूर्तीस विधिवत जलाभिषेक करण्यात आला. शिवशंभू वंदनेने संपूर्ण परिसरात भक्तिभाव आणि इतिहासाची जाणीव जागी झाली. या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये अभिमान, प्रेरणा आणि स्वराज्याची ऊर्जा संचारली.
प्रमुख भाषणात शुभम मोटे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल वेध घेतला. संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते विचारवंत, संस्कृतज्ञ आणि स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांच्या राज्याभिषेकाने मुघल व इतर परकीय सत्तांना स्पष्ट संदेश दिला की, भारत भूमी गुलामगिरी स्वीकारणारी नाही.असे ते म्हणाले. संभाजी महाराजांच्या धैर्य, बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात सचिन टेकवडे यांनी तळेगाव स्टेशन व गावभागाला जोडणारे श्री शिवशंभू तीर्थ हे केवळ धार्मिक नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे केंद्र ठरत असल्याचे नमूद केले. तळेगावच्या ऐतिहासिक वैभवात या तीर्थस्थळामुळे मोलाची भर पडत असून, नव्या पिढीला शिवशंभूंच्या कार्याची ओळख येथे मिळते. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम स्थळी शिवकालीन शस्त्रविद्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रणव विक्रम दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन कपिल देवडीगा यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन हर्षद सांडभोर यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री शिवशंभू तीर्थ समितीच्या सर्व सभासद व कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री शिवशंभू शिल्पाचे पूजन करण्यात आले. तसेच विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या सोहळ्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात इतिहासप्रेमी वातावरण निर्माण झाले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची उज्ज्वल परंपरा अधिक दृढपणे पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.




