राजकीयशहर

तळेगावात काँग्रेसला अंतर्गत भूकंप शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे निलंबित


तळेगावात काँग्रेसला अंतर्गत भूकंप शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे निलंबित

तळेगाव दाभाडे :
नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षातच घडलेला ‘अंतर्गत स्फोट’ आता उघडकीस आला असून, पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने तळेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांना पदावरून निलंबित केले आहे. तब्बल तीन दशकांचा राजकीय प्रवास असलेल्या यादवेंद्र खळदे यांच्यावर अचानक कोसळलेली ही कारवाई म्हणजे काँग्रेसच्या पक्षशिस्तीचा कडक इशारा मानला जात आहे.

नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी प्रचाराची धुरा खांद्यावर घ्यायची सोडून, यादवेद्र खळदे यांनी संशयास्पद शांतता पाळल्याचा आरोप आहे. काँग्रेसच्या झेंड्याखाली लढणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारात ते कुठेच दिसले नाहीत. उलटपक्षी, महायुतीचे आमदार सुनील शेळके यांच्या पॅनेलमध्ये त्यांची हालचाल वाढल्याचे चित्र पक्षाच्या वरिष्ठांच्या नजरेत भरले. काँग्रेसचा झेंडा हातात न घेता ‘दुसऱ्याच वाऱ्यावर नौका सोडल्याचा’ ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील घटक पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करताना खळदे यांचा सक्रिय सहभाग आढळून आला. ही बाब पक्षाच्या ध्येयधोरणांना हरताळ फासणारी असल्याचे मत जिल्हा कमिटीने नोंदवले. या गंभीर प्रकाराची दखल घेत यादवेंद्र खळदे यांना आठ दिवसांत खुलासा करण्याची ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या नोटिशीला त्यांनी न मौन तोडले, न उत्तर दिले. पक्षादेशाकडे केलेली ही दुर्लक्षाची भूमिका अखेर त्यांच्या अडचणी वाढवणारी ठरली.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. यापुढे यादवेंद्र खळदे यांना पक्षाशी संबंधित कोणताही अधिकृत निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीलाही पाठवण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवलेली निष्क्रियता, दुटप्पी राजकारण आणि पक्षविरोधी भूमिकेमुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचे निलंबनपत्रात नमूद करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे तळेगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, काँग्रेसमध्ये ‘शिस्त की सहानुभूती?’ असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *