ग्लास स्काय वॉक’ला दिवंगत अजित दादा पवार यांचे नाव द्या; मावळकरांची मागणी
ग्लास स्काय वॉक’ला दिवंगत अजित दादा पवार यांचे नाव द्या; मावळकरांची मागणी
लोणावळा, : मावळ तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी तालुक्यातील नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे. पर्यटन विकासाला नवी झेप देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामागील अजित दादांचे आर्थिक पाठबळ लक्षात घेता, हा प्रकल्प अजित दादांना समर्पित करावा, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट परिसरात पर्यटन सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी ग्लास स्काय वॉक प्रकल्प साकारला जाणार आहे. सुमारे ४.८४ हेक्टर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी तब्बल ३३३ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊ केला आहे . डोंगररांगांच्या कुशीत, निसर्गरम्य दरीकडे थेट काचेतून पाहण्याचा थरारक अनुभव देणारा हा प्रकल्प राज्यातील पर्यटन नकाशावर मावळला ठळक स्थान मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पर्यटनाच्या वाढत्या ओढीमुळे आठवड्याच्या शेवटी टायगर आणि लायन्स पॉईंट परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव, सुरक्षिततेचे प्रश्न आणि अनियोजित पार्किंग यामुळे अडचणी निर्माण होतात. ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पामुळे या परिसराचा शाश्वत व नियोजनबद्ध विकास साधता येणार असून पर्यटनाला आधुनिकतेची जोड मिळणार आहे.
प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर पर्यटकसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. परिणामी स्थानिकांना हॉटेल व्यवसाय, मार्गदर्शक सेवा, वाहतूक, हस्तकला व इतर पूरक उद्योगांतून रोजगारनिर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मावळ तालुक्याच्या अर्थचक्राला गती देणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचे मत व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्यांच्या पुढाकारामुळे आणि निधीमुळे हा प्रकल्प शक्य झाला, त्या दिवंगत अजित दादा पवार यांचे नाव या प्रकल्पाला द्यावे,अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या नामकरणासाठी निश्चितच पुढाकार घ्यावा, असा विश्वासही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला आहे.
या प्रकल्पाला निधी अजितदादांच्या पुढाकाराने मिळाला असल्याने या प्रकल्पाला नावही त्यांचेच असावे अशी नागरिकांची स्पष्ट भूमिका आहे
मावळच्या पर्यटन विकासाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाच्या नामकरणाचा निर्णय आता शासन पातळीवर कसा घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





