गोल्डन रोटरी सायकलथॉन 2026’ ला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .१२०० विद्यार्थ्यांचा सहभाग
गोल्डन रोटरी सायकलथॉन 2026’ ला तळेगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .१२०० विद्यार्थ्यांचा सहभाग
तळेगाव दाभाडे : पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश देत ‘गोल्डन रोटरी सायकलथॉन 2026’ हा उपक्रम रविवारी उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सायकल रॅलीला शहरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. जवळपास १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत शहरात पर्यावरणपूरक संदेशाची प्रभावी मिरवणूक काढली.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील आणि डी.जी. इलेक्ट (२०२६–२७) श्री. नितीन ढमाले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. सकाळी नेमक्या ७ वाजता नगराध्यक्षांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकलथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना क्रीडांगण व व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत “स्वच्छ, सुंदर व हरित तळेगाव” या संकल्पनेचा संदेश दिला.
शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि नागरिकांमधील घटता शारीरिक व्यायाम या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. सायकलिंग हा पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी पर्याय असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
रोटरी क्लबचे डी.जी. इलेक्ट श्री. नितीन ढमाले यांनी गोल्डन रोटरीच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचे कौतुक केले. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचे कार्य रोटरीतर्फे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
या सायकलथॉनसाठी ब्रह्मा असोसिएट्सचे श्री. अजय बवले तसेच वास्तु डेव्हलपर्सचे श्री. निलेश भोसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर श्री. दिपक फल्ले यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोल्डन सायकल प्रोजेक्ट चेअरमन रो. हर्षद जव्हेरी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष श्री. संतोष परदेशी यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री. प्रशांत ताए यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रोटरी सदस्य, रोटरॅक्ट सदस्य आणि स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध व अथक परिश्रम घेतले. रोटरॅक्टचे अध्यक्ष श्री. ललित देसले यांचीही यावेळी उपस्थिती होती.
एकूणच, तळेगाव दाभाडेकरांनी गोल्डन सायकलथॉनला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता दर्शवणारा ठरला. समाजात पर्यावरणपूरक जीवनशैलीची रुजवण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरला आहे.





