तळेगाव दाभाडेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक गाव, एक मिरवणूक’ संकल्पनेतून सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय
तळेगाव दाभाडेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक गाव, एक मिरवणूक’ संकल्पनेतून सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय
तळेगाव दाभाडे : येथे १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण नियोजन जाहीर करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांनी या परिषदेत बोलताना एक गाव, एक मिरवणूक ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
रमाकांत तरुण मंडळ तळेगाव दाभाडे तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या वेळी जयवंत कदम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुहास गरुड म्हणाले की, यंदाची जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश देणारी ठरणार आहे.
एक गाव, एक मिरवणूक या संकल्पनेनुसार गावातील सर्व मंडळे, संस्था आणि नागरिक एकत्र येऊन एकच भव्य मिरवणूक काढणार आहेत. वेगवेगळ्या मिरवणुका काढण्याऐवजी एकत्रितपणे साजरा होणारा हा उत्सव सामाजिक सलोखा वाढवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचा गजर, पारंपरिक लेझीम नृत्य, आकर्षक सजवलेले रथ आणि विविध सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधनासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येणार असून, युवकांच्या पुढाकारामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विविध घटकांनी एकत्र येऊन साजरा होणारा हा उत्सव तळेगावच्या सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
सुहास गरुड यांनी पुढे सांगितले की, तळेगावातील ही संकल्पना केवळ उत्सव न राहता एकता, समता आणि बंधुता या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरणार आहे. समाजातील भेदभाव दूर करून सर्व घटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.





