ताज्या घडामोडीसामाजिक

तळेगाव नगर परिषदेचा महिला दिन सोहळा : उद्योजकतेच्या स्टॉलमधून सबलीकरणाचा संदेश


तळेगाव नगर परिषदेचा महिला दिन सोहळा : उद्योजकतेच्या स्टॉलमधून सबलीकरणाचा संदेश

 

तळेगाव दाभाडे : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम, प्रदर्शन आणि महिला उद्योजिकांच्या सहभागातून हा सोहळा ‘स्वावलंबनाकडे वाटचाल’ या संकल्पनेला साजेसा ठरला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन कुलस्वामिनी महिला मंचाच्या अध्यक्षा सौ सारिका सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महिलांनी स्वकष्टाने उभारलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. महिलांच्या हाताने तयार झालेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

 

या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांनी उभारलेले विविध स्टॉल. हस्तकला, घरगुती खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू, कपडे, दागिने आणि कलात्मक वस्तू अशा विविध उत्पादनांचे सुमारे १४० स्टॉल या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. स्थानिक महिलांच्या कौशल्याचा आणि उद्योजकतेचा संगम या स्टॉलमधून पाहायला मिळाला. या माध्यमातून महिलांच्या स्वावलंबनाला चालना मिळेल, असा विश्वास सारिका शेळके यांनी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाच्या नियोजनात गटनेते हेमलता खळदे आणि शहर अभियान व्यवस्थापक विभा वाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नगर परिषदेतर्फे महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरसेविका शोभा परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना गटनेत्या हेमलता खळदे यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांची भूमिका, त्यांचे योगदान आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर यांनी ओघवत्या शैलीत केले. नगरसेविका भारती धोत्रे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

 

महिलांच्या सहभागामुळे आणि विविध उपक्रमांमुळे तळेगाव नगर परिषदेचा महिला दिन सोहळा उत्साहात पार पडला. महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *