आंबेठाण उड्डाणपुलाखाली भटक्या कुत्र्यांचा थरारक हल्ला; ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू. सीसीटीव्हीत घटना कैद
आंबेठाण उड्डाणपुलाखाली भटक्या कुत्र्यांचा थरारक हल्ला; ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू. सीसीटीव्हीत घटना कैद
चाकण : पुणे-नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला करून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१६ मार्च) उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली असून सीसीटीव्ही फुटेजमधून हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा थरार समोर आला आहे.
मृत महिलेचे नाव शोभा विजय वाघमारे (वय ३२) असे असून त्या सध्या चाकण येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे मूळ गाव देगलूर (जि. नांदेड) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दोनच्या सुमारास शोभा वाघमारे या पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याने जात होत्या. परिसर तुलनेने ओस पडलेला असताना अचानक सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेत हल्ला चढवला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेल्या महिलेने स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. काही क्षण त्या प्रतिकार करत राहिल्या. मात्र आक्रमक झालेल्या कुत्र्यांच्या झुंडीसमोर त्यांचा प्रतिकार निष्फळ ठरला.
कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर झडप घालत शरीराच्या विविध भागांवर चावे घेतले. या झुंडीच्या हल्ल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. झटापटीदरम्यान त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुमारे पंधरा मिनिटे हा थरारक प्रकार सुरू होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि गंभीर जखमांमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोमवारी सकाळी परिसरातील काही नागरिकांना उड्डाणपुलाखाली महिलेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने चाकण उत्तर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू करण्यात आला.
सुरुवातीला महिलेवर अत्याचार करून खून केल्याची चर्चा परिसरात रंगू लागली होती. मात्र घटनास्थळाजवळील दुकाने व आस्थापनांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले असता संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाला. फुटेजमध्ये कुत्र्यांची झुंड महिलेवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे निश्चित झाले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, देवराम बुरुड, भैरोबा यादव, महेश कोळी आणि अक्षय सांडभोर यांच्या पथकाने घटनास्थळी तपास करत पुरावे गोळा केले. तसेच महिलेच्या नातेवाईकांचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे चाकण शहरासह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या हा गंभीर प्रश्न बनत चालल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर मुक्त संचार करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर चाकण व परिसरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कुत्र्यांचे निर्बीजिकरण, त्यांचे स्थलांतर तसेच सुरक्षिततेसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आंबेठाण चौकाजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून रात्रीच्या वेळी सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पावले उचलून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.





