तळेगाव दाभाडे पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा; जवानाचा मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
तळेगाव दाभाडे पोलिसांचा तपासात हलगर्जीपणा; जवानाचा मृत्यू, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
तळेगाव दाभाडे : शहरातील पोलिसांच्या तपासातील हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही त्याची ओळख पटविण्यात आणि कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात झालेल्या विलंबामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत प्रकाश कदम (रा. तळेगाव दाभाडे) हे गुजरातमधील गांधीनगर येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. ते २५ मार्च रोजी ड्युटीवर जात आहे असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते लोणावळा येथून पुन्हा तळेगावच्या दिशेने परतले, याची माहिती कोणालाही दिली नव्हती. त्याचवेळी त्यांनी आपला मोबाईल फोनही बंद ठेवला होता.
दरम्यान, २५ मार्चच्या रात्री सोमाटणे फाटा परिसरात, हॉटेल अंगणसमोर रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला अशी नोंद करण्यात आली. मात्र, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ती तत्परता पोलिसांकडून दाखविण्यात आली नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच कालावधीत प्रशांत कदम बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी याच पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
मागील दोन ते तीन दिवस कुटुंबीय आणि पोलिसांकडून स्वतंत्रपणे शोधमोहीम सुरू होती. तरीही, एकाच पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि अनोळखी मृतदेहाची नोंद असतानाही त्याची सांगड घालण्यात पोलिसांना अपयश आले. या निष्काळजीपणामुळे कुटुंबीयांना अनावश्यक मानसिक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, प्रशांत कदम यांचा मृतदेह वायसीएम रुग्णालयात असल्याची माहिती पोलिसांकडून नव्हे, तर त्यांच्या मित्रांनी शोध घेऊन कुटुंबीयांना दिली. ही बाब अधिकच धक्कादायक मानली जात आहे. मित्रांकडून ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गंभीर अपघातासारख्या घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि नातेवाईकांशी संपर्क साधणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात झालेल्या विलंबामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांमध्येही या प्रकारामुळे नाराजीचे वातावरण असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.





