तळेगाव दाभाडेत विनापरवानगी फ्लेक्सचा सुळसुळाट; नगरपरिषद झोपेत, नागरिक संतप्त
तळेगाव दाभाडेत विनापरवानगी फ्लेक्सचा सुळसुळाट; नगरपरिषद झोपेत, नागरिक संतप्त
तळेगाव दाभाडे : शहरात सध्या विनापरवानगी फ्लेक्सबाजीने अक्षरशः उच्छाद मांडला असून प्रत्येक चौकात, गल्लीबोळात अनधिकृत फ्लेक्स लावलेले दिसून येत आहेत. या बेकायदेशीर फ्लेक्समुळे शहराच्या सौंदर्यावर गालबोट लागत असून तळेगाव दाभाडे शहराची ओळख गचाळ आणि अव्यवस्थित शहर म्हणून निर्माण होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या सर्व प्रकाराकडे तळेगाव दाभाडे नगरपरिषद च्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पूर्णतः डोळेझाक केल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित विभाग झोपेत आहे का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असताना कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही या परिस्थितीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनधिकृत फ्लेक्समुळे शहराची प्रतिमा मलिन होत असून काही जण तळेगाव शहराबाबत अवमानकारक शब्दांत प्रतिक्रिया देताना ऐकायला मिळत असल्याचे नागरिक सांगतात. यामुळे स्थानिकांना लाजिरवाणी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
याउलट पिंपरी चिंचवड महानगरपालिका ने आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २१.५० कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. नियोजनबद्ध कारवाई आणि कठोर अंमलबजावणीमुळे पीसीएमसी प्रशासनाने उत्पन्नात मोठी वाढ साधली आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडूनही अशाच प्रकारच्या प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहरातील अनधिकृत फ्लेक्स त्वरित हटवून जबाबदारांवर दंडात्मक कारवाई करावी. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. तळेगाव शहरात शहराच्या बाहेरील अनेक नागरिक व व्यावसायिक येऊन बिनधास्तपणे आपले अनाधिकृत फ्लेक्स लावून जात आहे .शहरातील प्रत्येक विद्युत खांबांवर देखील अनाधिकृत पणे फ्लेक्स लावले जात आहे याकडेही पालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे
दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद केव्हा जागी होणार आणि या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर कधी अंकुश लावणार, हा प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.




