शहर

तळेगावात सहकाराचा नवा चेहरा:डोळसनाथ पतसंस्थेत युवा नेतृत्वाची बिनविरोध एन्ट्री


तळेगावात सहकाराचा नवा चेहरा:डोळसनाथ पतसंस्थेत युवा नेतृत्वाची बिनविरोध एन्ट्री

तळेगाव दाभाडे : सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि नव्या विचारांची जोड देत शहरातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेत नेतृत्व बदलाची सकारात्मक नांदी पाहायला मिळाली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी युवा उद्योजक शंकर छबुराव भेगडे यांची बिनविरोध निवड होत सहकार क्षेत्रात नव्या उमेदीचा शिडकावा झाला आहे.

याचबरोबर, पुणे पिपल्स बँकेचे बँक ऑफ डायरेक्टर संचालक कौस्तुभ बबनराव भेगडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता महेश मंचरे यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली. या तिन्ही मान्यवरांचा संस्थेच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या निवडीमुळे संस्थेच्या कार्यपद्धतीत आधुनिकतेचा स्पर्श आणि समाजाभिमुख दृष्टिकोन अधिक बळकट होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सत्कार सोहळा हा उत्साहपूर्ण आणि सहकारभावनेने ओतप्रोत भरलेला होता. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक बबनराव भोंगाडे, अध्यक्ष शरद भोंगाडे, पतसंस्थेचे आधारस्तंभ व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संतोष भेगडे, खजिनदार अमित भसे, उपाध्यक्ष समीर भेगडे, व्यवस्थापक अनिल भोमे यांच्यासह अंकुश आंबेकर, अरविंद गद्रे, राहुल पारगे, आशिष खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन नेतृत्वाच्या निवडीमुळे संस्थेच्या विकासाला वेग मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. विशेषतः तरुण नेतृत्वामुळे डिजिटल व्यवहार, ग्राहकाभिमुख सेवा आणि आर्थिक शिस्त यावर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सत्काराला उत्तर देताना कौस्तुभ भेगडे म्हणाले की, ही निवड केवळ पदाची नाही, तर जबाबदारीची जाणीव आहे. संस्थेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सदस्यांच्या हिताला प्राधान्य देत काम करू. सहकाराच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत आर्थिक सक्षमतेचा संदेश पोहोचवणे हेच आमचे ध्येय राहील.

या निवडीमुळे तळेगावातील सहकार क्षेत्रात नवचैतन्याची चाहूल लागली असून, संस्थेच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *