सामाजिक

वडगावात सामूहिक विवाहाचा भव्य सोहळा; ७ जोडपी विवाहबद्ध, हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग


वडगावात सामूहिक विवाहाचा भव्य सोहळा; ७ जोडपी विवाहबद्ध, हजारोंचा उत्स्फूर्त सहभाग

वडगाव (मावळ) :
सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य कुटुंबांना आधार देणाऱ्या उपक्रमांची परंपरा पुढे नेत स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात मावळ तालुक्यातील विविध भागांतील सात जोडपी हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने विवाहबद्ध झाली. वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे व सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात श्रींच्या अभिषेकाने धार्मिक वातावरणात झाली. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी उपस्थितांचे स्वागत करत नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, पल्लवी दाभाडे, सभापती सुनीता येवले, नगराध्यक्ष अबोली ढोरे, सुनीता कुडे, दिलीप ढोरे, राजेंद्र कडलक, प्राची गायकवाड, रेश्मा देवकर, सुनीता केदारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला अधिकच प्रतिष्ठा प्राप्त झाली.

यानंतर पारंपरिक पद्धतीने वधू-वरांचा हळदी समारंभ पार पडला. वऱ्हाडी मंडळींसाठी उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली होती. नवरदेवांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून ढोल-ताशांच्या गजरात वातावरण दणाणून गेले होते. या मिरवणुकीत युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक उपक्रमांना दिलेले प्राधान्य. जनरल हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात पदाधिकारी, वऱ्हाडी मंडळी तसेच विविध ट्रेडिंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजोपयोगी कार्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.

सायंकाळी हजारोंच्या उपस्थितीत मुख्य विवाह सोहळा पार पडला. पारंपरिक विधींसह सातही जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. या वेळी आमदार सुनील शेळके व भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी एकवीरा देवस्थान अध्यक्ष दीपक हुलावळे, उपसभापती साहेबराव कारके, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, बाजार समिती सभापती सुभाषराव जाधव, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, पोटोबा महाराज देवस्थान अध्यक्ष किरण भिलारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्यातील अन्नदानासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल संचालक संजय दंडेल व रेणुका दंडेल यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे स्वागत सोहळा समिती अध्यक्ष अनिल कोद्रे यांनी केले, तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव गणेश विनोदे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या संपूर्ण सोहळ्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने काम केले. कार्याध्यक्ष खंडुजी काकडे, कार्यक्रमप्रमुख संभाजी येळवंडे, उपाध्यक्ष सुधीर ढोरे, सचिव कार्तिक यादव, खजिनदार अक्षय बेल्हेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. तसेच अर्जुन ढोरे, राजेंद्र वहिले, विलास दंडेल, रोहिदास गराडे, अजय धडवले, अरुण वाघमारे, काशिनाथ भालेराव, विवेक गुरव, अविनाश कुडे, सुनील शिंदे, सोमनाथ धोंगडे, शंकर ढोरे, महेश तुमकर, नंदकुमार ढोरे, बाळासाहेब तुमकर, विनय लवंगारे, प्रवीण कुडे, अनिकेत भगत, गणेश ढोरे, सुहास विनोदे, ओंकार तुमकर, सतीश गाडे, उमेश ढोरे, मंगेश तुमकर, शिवाजी येळवंडे, जितेंद्र ढोरे, महेश ढोरे, अर्पण ढोरे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनीही मोठे योगदान दिले.

सोहळ्याची वैशिष्ट्ये :

रक्तदान शिबिराचे आयोजन

वऱ्हाडी मंडळींसाठी बैठक व भोजन व्यवस्था

नवरदेवांची भव्य मिरवणूक

वधू-वरांना संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळ व आकर्षक भेटवस्तू

वधूंना चांदीचे अलंकार

सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देत सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सोहळा मावळ तालुक्यासाठी आदर्श ठरला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *