राजकीय

अजितदादांच्या कार्यदीपाला वंदन:राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापनदिन १० जून ला वडगाव मावळ मधे होणार ध्वजारोहण


अजितदादांच्या कार्यदीपाला वंदन:राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापनदिन १० जून ला वडगाव मावळ मधे होणार ध्वजारोहण

वडगाव(मावळ):राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापनदिनाला यंदा भावनिक आणि संघटनात्मक असा दुहेरी आयाम लाभला असून, पक्षविस्तारासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या अजित दादांच्या कार्यस्मृतींना अभिवादन करत हा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून संघटन रुजविणे, कार्यकर्त्यांना दिशा देणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी योगदान देणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याचा गौरव यानिमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

बुधवार, दि. १० जून रोजी सकाळी १०.१० वाजता वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात पक्षध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील (अण्णा) शंकरराव शेळके यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादीचा ध्वज फडकविण्यात येणार असून, या सोहळ्याला तालुकाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

गेल्या २७ वर्षांच्या राजकीय वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटविला आहे. संघर्ष, संघटन आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या बळावर पक्षाने ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत आपले जाळे विस्तारले. या प्रवासात कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणाऱ्या नेतृत्वाने पक्षाला दिलेली ऊर्जा आणि संघटनात्मक बळ आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत मानले जाते.

याच पार्श्वभूमीवर यंदाचा वर्धापनदिन केवळ औपचारिक उत्सव न राहता कार्यकर्त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि पक्षनिष्ठेचा जागर ठरणार आहे. ध्वजारोहणानंतर पक्षाच्या वाटचालीचा आढावा, संघटन बळकटीकरणाबाबत चर्चा तसेच आगामी राजकीय आव्हानांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समिती सदस्यांसह तालुका कार्यकारिणी, विविध सेलचे अध्यक्ष, शहर व विभाग सुकाणू समिती सदस्य, शहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, गावाध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजितदादांनी घालून दिलेला संघटन उभारणीचा मार्ग हा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि पक्षाच्या २७ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन गणेश खांडगे यांनी केले. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त मावळ तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षकार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे चित्र दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *