मोरया चौकात सीसीटीव्ही व ओपन जिमची नागरिकांची मागणी: वडगाव मावळ नगरपंचायतीला निवेदन
मोरया चौकात सीसीटीव्ही व ओपन जिमची नागरिकांची मागणी: वडगाव मावळ नगरपंचायतीला निवेदन
वडगाव (मावळ): वडगाव मावळ येथील ढोरे वाडा परिसरातील मोरया चौकात नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जिम उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, नगराध्यक्षा अबोली मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष सुनिल गणेश ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ राजाराम ढोरे आणि स्थानिक नगरसेविका रूपाली अतुल ढोरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात मोरया चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असून रस्त्यावर लहान मुलांचीही सतत ये-जा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चोरी, संशयास्पद हालचाली तसेच इतर गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच ओपन जिम उभारण्यात आल्यास युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नियमित व्यायामाची सुविधा उपलब्ध होऊन परिसरातील आरोग्यदायी वातावरणाला चालना मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
या मागणीवर नगरपंचायत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अर्जदार संजय सजन दंडेल आणि सतीश सदाशिव गाडे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षिततेसह सार्वजनिक सुविधांच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.





