महत्त्वाचे

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या २७५ स्वच्छता दूतांची दिवाळी गोड; अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ८.३३ टक्के बोनसची रक्कम खात्यात जमा


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या २७५ स्वच्छता दूतांची दिवाळी गोड; अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ८.३३ टक्के बोनसची रक्कम खात्यात जमा

 

तळेगाव दाभाडे : स्वतःच्या सणाचा आनंद बाजूला ठेवून संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात यंदा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे २७५ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दिवाळी बोनस देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बोनसची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

 

शहरातील रस्ते, चौक, गल्लीबोळ स्वच्छ ठेवण्यापासून कचरा संकलन, वाहतूक आणि उद्यानांच्या देखभालीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या हे कर्मचारी पार पाडतात. ऊन असो, पाऊस असो अथवा सणासुदीचे दिवस; नागरिकांचे शहर स्वच्छ राहावे यासाठी त्यांचे हात सातत्याने राबत असतात. मात्र, स्वतःच्या दिवाळीच्या आनंदासाठी त्यांना अनेक वर्षे बोनसची प्रतीक्षा करावी लागत होती.

 

नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची आग्रही मागणी सर्व नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) आणि आरोग्य समिती सभापती निखिल भगत यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला. एनडीके कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये इंडिके कंपनीच्या माध्यमातून बोनसची रक्कम जमा करण्यात आली.

 

या निर्णयामुळे कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत आर्थिक दिलासा मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा केवळ बोनसचा नसून, आपल्या मेहनतीची दखल घेतली गेल्याचा आहे.

 

यावेळी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) आरोग्य समिती सभापती निखिल भगत, गटनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक विनोद भेगडे, सुरज सातकर, नगरसेविका आशा भेगडे, मनीषा म्हाळस्कर, सुपरवायझर विशाल पवार, हरिचंद्र भोसले, सुनील खंडागळे यांच्यासह सर्व नगरसेवकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

 

शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या स्वच्छता दूतांची दिवाळी यंदा बोनसची रक्कम बँकेत जमा झाल्याने अधिक गोड झाली आहे. तसेच पीएफ आणि ईएसआयचा प्रश्नही लवकरच मार्गी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

 

शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या सणात आनंदाची भर घालणारा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची अनमोल भेट ठरला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *