महत्त्वाचे

मावळ तालुक्यात अनधिकृत भंगार दुकानांचे पेव: प्रशासनाचा धाक उरला कुठे? परवानग्यांचा पत्ता नाही, उघड्यावर भंगार जाळण्याचे प्रकार: पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!


मावळ तालुक्यात अनधिकृत भंगार दुकानांचे पेव: प्रशासनाचा धाक उरला कुठे?

परवानग्यांचा पत्ता नाही, उघड्यावर भंगार जाळण्याचे प्रकार: पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

 

मावळ : मावळ तालुक्यात अनधिकृत भंगार व्यवसायाचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असून, नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परराज्यांतून आलेल्या काही भंगार व्यावसायिकांनी तालुक्यात विविध ठिकाणी आपले बस्तान बसवले असून, आवश्यक शासकीय परवानग्यांशिवाय बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांच्या परिसरात दुकाने थाटल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

 

या व्यवसायासाठी आवश्यक असलेले गुमास्ता परवाने, ट्रेड लायसन्स, प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच पोलिस ठाण्यातील नोंदणी यांची पूर्तता झाली आहे का, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोखंड, प्लास्टिक, जुन्या बॅटऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची साठवणूक व विल्हेवाट लावताना पर्यावरणविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना अनेक ठिकाणी या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

अनेक भंगार व्यावसायिक उघड्यावर भंगारातील वस्तू जाळत असल्याने परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरते. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्वलनशील साहित्याचा मोठ्या प्रमाणात साठा होत असल्याने आगीसारख्या दुर्घटनेचा धोकाही नाकारता येत नाही.

 

वार्षिक उलाढाल निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असलेल्या व्यावसायिकांना नियमानुसार जीएसटी नोंदणी आवश्यक असते. मात्र, करप्रणालीचे पालन होत आहे की नाही, याचीही तपासणी होणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार सुरू असताना पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी नेमके काय करत आहेत? अनधिकृत व्यवसायांना अभय मिळते आहे की प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी स्थानिक मंडळींकडूनच अशा व्यवसायांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची चर्चा आहे.

 

 अनधिकृत भंगार दुकानांची संयुक्त तपासणी करून बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी खेळणाऱ्या या अनियंत्रित व्यवसायांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *