लोनावळा शहरात भरदिवसा मोठी घरफोडी: १४ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास:लक्ष्मीपूजनासाठी देव्हाऱ्यासमोर ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
लोनावळा शहरात भरदिवसा मोठी घरफोडी: १४ लाख ५ हजारांचा ऐवज लंपास:लक्ष्मीपूजनासाठी देव्हाऱ्यासमोर ठेवलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
लोनावळा : दिवाळीच्या सणानिमित्त घरात लक्ष्मीपूजनासाठी श्रद्धेने ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना लोनावळा शहरातील गवळीवाडा परिसरात उघडकीस आली आहे. देव्हाऱ्यासमोरील चौरंगावर ठेवलेले दागिनेच चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घरफोडीत तब्बल १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम सूर्यकांत कदम यांच्या देवकीनंदन अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक १०१, गवळीवाडा, लोनावळा येथील राहत्या घरी सोमवार (दि. ९ नोव्हेंबर २०२६) रोजी सकाळी पावणे सहा ते साडेसातच्या दरम्यान ही चोरी झाली. घराच्या बाहेरून लावलेली कडी अज्ञात चोरट्याने उघडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाकघरातील देव्हाऱ्यासमोर चौरंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीला गेलेल्या ऐवजात आठ तोळ्यांचे सोन्याचे तीनपदरी मंगळसूत्र (६ लाख ४० हजार रुपये), चार तोळे पाच ग्रॅमचा राणीहार (३ लाख ६० हजार रुपये), एक तोळा दोन ग्रॅमचा सोन्याचा चोकर (९६ हजार रुपये), कानातील सोन्याचे स्क्वेअर टॉप (७६ हजार रुपये), सुईधागा टॉप (५२ हजार रुपये), सोन्याचे टॉप (२४ हजार रुपये), झुमके (७२ हजार रुपये), दोन सोन्याच्या चैन (अनुक्रमे ९६ हजार व १ लाख २८ हजार रुपये) आणि तीन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय २५ हजार ५०० रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली आहे.
विशेष म्हणजे, घरातील मौल्यवान ऐवज देव्हाऱ्यासमोर ठेवलेला असताना चोरट्यांनी संधी साधून चोरी केली. सकाळच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी नीलम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध लोनावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार खोपडे यांनी केली.
सणासुदीच्या काळात घरातील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.





