सामाजिक

उकसान पठारावरील पाड्यांमध्ये दिवाळीचा सामाजिक दीपोत्सव:विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाचा पुढाकार: हिंदू अवघा बंधू बंधू चा कृतीतून जागर


उकसान पठारावरील पाड्यांमध्ये दिवाळीचा सामाजिक दीपोत्सव:विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाचा पुढाकार: हिंदू अवघा बंधू बंधू चा कृतीतून जागर

 

 

 

उकसान पठार(मावळ) : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने उकसान पठार परिसरातील विविध पाड्यांवर दिवाळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू अवघा बंधू बंधू या विचाराला कृतीची जोड देत सामाजिक समरसता, बंधुभाव आणि एकात्मतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

शेडगे वस्ती, डोंगरवाडी, सटवाईवाडी आणि धनगर पठार येथील प्रत्येक घरापर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी प्रत्येक कुटुंबाला दिवाळीच्या पणत्या, फटाके, रांगोळी, मिठाई, नवीन कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पाड्यांवरील कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

 

या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते सामूहिक स्नेहभोजन. जात-पात, उच्च-नीच आणि सामाजिक भेदभावाच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकाच पंगतीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला. एकत्रित सण साजरा करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न झाला.

 

प्रा. बाळासाहेब खांडभोर यांनी मार्गदर्शन करताना, भारताचा गौरवशाली इतिहास हा सामाजिक समरसतेचा अमृतकुंभ असून, समरसता प्रत्यक्ष जगण्याची प्रेरणा देणारा सण म्हणजे दीपावली, असे प्रतिपादन केले. संतोष भेगडे (पाटील) यांनी पाड्यांवरील दीपावली उत्सवाचे महत्त्व विशद केले. युवा उद्योजक रणजित काकडे यांनी हा उत्सव हिंदू संस्कृतीतील एकतेचा दुर्मिळ सोहळा असल्याचे सांगितले.

 

या वेळी संतोष भेगडे( पाटील) रणजित काकडे, युवराज शिंदे, महेंद्र असवले, अमित भेगडे, सचिन शेलार, विनायक भेगडे, बाळासाहेब खांडभोर, रामभाऊ शेडगे, लक्ष्मण शेडगे आदी उपस्थित होते. महेंद्र असवले यांनी सूत्रसंचालन केले.

 

सेवा, समर्पण आणि संघटनाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारा हा दीपोत्सव परिसरात चर्चेचा विषय ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *