जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये रुद्रप्रताप बोराडेची सुवर्ण झेप:राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड: एम. जी. फिटनेसच्या शिरपेचात मानाचा तुरा
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंगमध्ये रुद्रप्रताप बोराडेची सुवर्ण झेप:राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड: एम. जी. फिटनेसच्या शिरपेचात मानाचा तुरा
तळेगाव दाभाडे : जिद्द, मेहनत आणि कठोर सरावाच्या जोरावर क्रीडाक्षेत्रात यशाची नवी उंची गाठणाऱ्या एम. जी. फिटनेसच्या रुद्रप्रताप प्रिया प्रमोद बोराडे याने जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ५० किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत त्याने मिळविलेल्या या यशामुळे तळेगाव दाभाडे शहराच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वेटलिफ्टिंगसारख्या ताकद, तंत्र, एकाग्रता आणि प्रचंड शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या खेळात रुद्रप्रतापने आपल्या कौशल्याची छाप उमटवली आहे. नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि अपयशाला न जुमानता ध्येयाच्या दिशेने सुरू ठेवलेली वाटचाल यामुळे त्याने अल्पावधीतच या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हास्तरावर मिळविलेले सुवर्णपदक हे त्याच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.
रुद्रप्रतापच्या या यशामागे एम. जी. फिटनेसचे संचालक तथा प्रशिक्षक आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणातून खेळाडूंमध्ये शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मक आत्मविश्वास विकसित करण्यावर भर दिला जात आहे.
जिल्हास्तरावरील सुवर्ण यशानंतर आता राज्यस्तरीय स्पर्धेतही रुद्रप्रतापकडून पदकाची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याच्या या यशाबद्दल एम. जी. फिटनेस परिवारासह मावळ तालुक्यातील आणि तळेगाव दाभाडे शहरातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.





