सांकोसा प्रतिष्ठानच्या भव्य किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बालचमूंनी साकारल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती
सांकोसा प्रतिष्ठानच्या भव्य किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बालचमूंनी साकारल्या शिवकालीन गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती
तळेगाव दाभाडे : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, सह्याद्रीच्या कुशीत उभे असलेले दुर्गवैभव आणि महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेचा वारसा नव्या पिढीच्या मनावर कोरण्याच्या उद्देशाने सांकोसा प्रतिष्ठान, मावळ–पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६ ला बालस्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिमुकल्या हातांनी कल्पकतेची जोड देत साकारलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमातून बालमनात इतिहासाची आवड, सर्जनशीलता आणि शिवकालीन दुर्गवैभवाविषयी अभिमान जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्पर्धेत पन्हाळगड, पावनखिंड व विशाळगड यांच्या प्रतिकृती साकारणाऱ्या पवन कारोडे, आयुष घोटकर, वेदांत आकाशे व आदित्य देवरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तोरणा अर्थात प्रचंडगड साकारणाऱ्या आराध्या जाधव व अभिनव जाधव यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर प्रतापगडाची प्रतिकृती साकारणाऱ्या समिता कांबळे यांनी तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले. जंजिरा किल्ला साकारणाऱ्या अथर्व माळी, निखिल माळी, अथर्व पाटील व रश्मी इंगोले यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
या स्पर्धेत ओवी विजय चौगुले, श्रावी चौगुले, मल्हार निर्मळे, महेश सावंत, आरहान शेख, रेयांश मोठे, वंश अगरवाल, स्वामिनी देवर्षी, सुमित देवर्षी, रुद्र संतोष मोहिते, अभिमन्यू रघुनाथ गावाडे, जान्हवी सुनील पवार, वेदिका मोरे यांच्यासह अनेक बालस्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शुभम शंकरराव देसाई, उपाध्यक्ष विठ्ठल कांबळे, सचिव ईश्वर देशमाने, सहसचिव हणमंत पानसरे, संचालक समाधान गिरी, समिती सदस्य राहुल पाटील व पांडुरंग पाटील, तसेच सदस्य महादेव कांबळे, विजय मोरे, अप्पासो माळी आदी उपस्थित होते.
प्रमुख मान्यवर म्हणून वृषालीराजे दाभाडे सरकार (मासाहेब), सागर काकडे, पत्रकार रेश्मा फडतरे, मोहन मेटकरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या उपक्रमासाठी सद्गुरू कलेक्शन, मेजर संदीप जाधव, रेश्मा फडतरे व संतोष दाभोळे यांचे विशेष सौजन्य व सहकार्य लाभले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संचालक, सदस्य आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक योगदानातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
इतिहास केवळ पुस्तकांतून शिकण्याचा विषय नसून तो कृतीतून अनुभवण्याची संधी आहे, याची प्रचिती या स्पर्धेने दिली. बालहातांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांतून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचा वारसा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचा सांकोसा प्रतिष्ठानचा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.





