उद्या कान्हे रेल्वे गेट येथील एलसी क्रमांक ४५ एक दिवस बंद. डांबरीकरणामुळे वाहतुकीत बदल पर्यायी मार्ग जांभूळ अंडर पासचा उपयोग करावा
उद्या कान्हे रेल्वे गेट येथील एलसी क्रमांक ४५ एक दिवस बंद. डांबरीकरणामुळे वाहतुकीत बदल
पर्यायी मार्ग जांभूळ अंडर पासचा उपयोग करावा
कान्हे:
मध्य रेल्वेच्या केएमएसटी–टीजीएन (KMST–TGN) विभागातील कान्हे गेट येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ४५ (कि.मी. १४८/५–६) येथे डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याने मंगळवार, दि. २७ जानेवारी २०२६ रोजी हा एलसी रस्ते वाहतुकीसाठी एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. सदर काम सकाळी ८.०० वाजल्यापासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एलसी क्रमांक ४५ येथे रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कामामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बंद कालावधीत एलसी क्रमांक ४७ (जांभुळ गेट) येथील एलएचएस पूल रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व हलकी व जड वाहने त्या मार्गाने वळविण्यात येतील.
या वाहतूक बदलाबाबत नागरिकांना आगाऊ माहिती मिळावी यासाठी विविध दैनिके व वृत्तपत्रांमध्ये व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना पीआरओ/पीए यांना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित ग्रामपंचायत कान्हे, ग्रामीण पोलीस (केएमएसटी व व्हीडीएन), एसटी डेपो टीजीएन, आरपीएफ टीजीएन, तसेच रेल्वेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत कळविण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हे काम सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असून काम पूर्ण झाल्यानंतर एलसी क्रमांक ४५ पूर्ववत सुरू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





