हिंदमाता भुयारी मार्ग ते स्वन्ननगरी रस्ता मार्गी. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या पुढाकाराला यश
हिंदमाता भुयारी मार्ग ते स्वन्ननगरी रस्ता मार्गी. नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या पुढाकाराला यश
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरातील हिंदमाता भुयारी मार्ग ते स्वन्ननगरी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून हे काम नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे तसेच नगरसेवकांच्या संयुक्त पुढाकारातून मार्गी लागले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना दैनंदिन वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
हिंदमाता भुयारी मार्ग ते स्वन्ननगरी हा रस्ता अरुंद अपुरा व खड्ड्यांनी व्यापला असल्याने वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात चिखल, तर उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिक त्रस्त होते. या समस्येची दखल घेत नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम हाती घेतले. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर,
नगराध्यक्ष संतोष दाभाडे व उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करून कामाला मंजुरी मिळवून दिली.
या रस्त्याच्या कामात सुनील दाभाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाची भूमिका बजावली आहे. रस्ता व्हावा, नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या सामाजिक भावनेतून त्यांनी आपल्या मालकीची जागा स्वेच्छेने खुली करून दिली. त्यांच्या या निर्णयामुळे रस्त्याचे काम विनाअडथळा सुरू होऊ शकले. या सामाजिक योगदानाबद्दल परिसरातील नागरिकांनी सुनील दाभाडे व त्यांच्या कुटुंबीयांचे विशेष कौतुक केले आहे.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे व सर्व नगरसेवकांची पाठ थोपटली. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळेच शहराचा विकास शक्य आहे. हा रस्ता परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून भविष्यातील वाहतूक सुलभ होण्यास मदत करणार आहे.असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर स्वन्ननगरी, हिंदमाता परिसर तसेच लगतच्या वसाहतींतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून तळेगाव दाभाडे शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे.





