स्वच्छता दूतांचा संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त कृतज्ञता सन्मान; २३ फेब्रुवारीला तळेगावात विशेष उपक्रम
स्वच्छता दूतांचा संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त कृतज्ञता सन्मान. २३ फेब्रुवारीला तळेगावात विशेष उपक्रम
तळेगाव दाभाडे : स्वच्छतेचा संदेश देत समाजप्रबोधन करणारे संत शिरोमणी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी विशेष स्वच्छता सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या स्वच्छ तळेगाव – सुंदर तळेगाव या संकल्पनेतून या उपक्रमाला आकार देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील स्वच्छता दूतांचे त्यांच्या कार्यस्थळी जाऊन औक्षण करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. दररोज पहाटेपासून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी झटणाऱ्या या सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शहर स्वच्छतेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. स्वच्छतेसाठी सदैव दोन पावले पुढे असणाऱ्या या सेवकांना सलाम, असा संदेश देत नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील म्हणाले, संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर स्वच्छता आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीदिनी आपण शहरातील स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देत आहोत. स्वच्छ आणि सुंदर तळेगाव ही केवळ घोषणा नसून ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.
रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेच्या पदाधिकाऱ्यांनीही नागरिकांना चला, आपणही एक पाऊल पुढे टाकूया असे आवाहन करत स्वच्छ व सुंदर तळेगाव घडविण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन केले. शहरातील विविध भागांत सकाळी हा सन्मान सोहळा पार पडणार असून, नागरिकांनी स्वच्छता दूतांचे स्वागत करून त्यांच्या कार्याला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





