शिवज्योत आणण्याच्या वाटेवर काळाचा घाला: आंदर मावळातील दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू
शिवज्योत आणण्याच्या वाटेवर काळाचा घाला: आंदर मावळातील दोन शिवभक्तांचा भीषण अपघातात मृत्यू
कामशेत (मावळ) :
छत्रपती शिवरायांच्या स्मृतीप्रती अपार श्रद्धा व्यक्त करत विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी भक्तिभावाने घराबाहेर पडलेल्या आंदर मावळातील दोन तरुण शिवभक्तांवर काळाने अचानक झडप घातली. नायगाव येथे झालेल्या भीषण अपघातात शिंदेवाडी येथील ओमकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण आंदर मावळ परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदर मावळातील शिंदेवाडी-घाटेवाडी येथील ओमकार आरडे आणि दर्शन शिंदे हे दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्याच्या पवित्र उद्देशाने निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली नितांत श्रद्धा आणि शिवज्योतीच्या स्वागताचा उत्साह मनात घेऊन त्यांनी प्रवास सुरू केला होता. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास नायगाव परिसरात त्यांच्या वाहनासमोरून येणाऱ्या एका भरधाव कारने अचानक डिव्हायडर तोडत विरुद्ध दिशेने येत जोरदार धडक दिली. एमएच १४ जेए ५१११ या क्रमांकाच्या कारचा वेग इतका प्रचंड होता की, धडक क्षणातच भीषण अपघातात परिवर्तित झाली. या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही क्षणांपूर्वी शिवज्योत आणण्याच्या उत्साहाने निघालेले हे दोन तरुण क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेले. धर्मकार्याच्या पवित्र हेतूने प्रवासाला निघालेल्या या शिवभक्तांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने आंदर मावळ परिसर सुन्न झाला आहे. गावात शोकसागर पसरला असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेने शिवभक्तांमध्ये तीव्र दुःखाची भावना व्यक्त होत असून ‘शिवज्योत आणण्याच्या पवित्र वाटेवर दोन तरुणांचे प्राण गेले अशी हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.





