स्वच्छतेसोबतच भाषेचा सन्मान राखला जाईल का.
स्वच्छतेसोबतच भाषेचा सन्मान राखला जाईल का?
तळेगाव दाभाडे : शहरात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूतांचा कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात पार पडला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करत नगर परिषदेकडून त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी स्वागत केले; मात्र त्याचवेळी शहरात सुरू असलेल्या एका वेगळ्याच प्रकारामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.
शहरात दररोज सकाळी फिरणाऱ्या स्वच्छता विभागाच्या घंटागाड्यांवर हिंदी गाणी व घोषणा वाजवल्या जात असल्याने मराठीप्रेमी नागरिकांत नाराजीचे वातावरण आहे. कचरे वाली गाड़ी आई घर से कचरा निकाल अशा हिंदी घोषणा ध्वनिक्षेपकावरून दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा दर्जा दिलेला असताना अशा प्रकारे हिंदी घोषणांचा वापर करणे म्हणजे राजभाषेचा अवमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, नगराध्यक्षांनी यापूर्वी नागरिकांना कचरेवाले असे संबोधू नये, असा सल्ला दिला होता. मात्र प्रत्यक्षात घंटागाड्यांवरून हिंदी गाणी वाजत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छता दूतांचा गौरव एका बाजूला आणि राजभाषेबाबत उदासीनता दुसऱ्या बाजूला, अशी विसंगती असल्याचा आरोप होत आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र सामाजिक माध्यमांवर या विषयाने जोर धरला असून, मराठी घोषणांचा तातडीने अवलंब करावा, अशी मागणी पुढे येत आहे. मराठी राज्यात मराठीच ऐकू यायला हवी. शासनाच्या राजभाषा धोरणालाच हरताळ फासणारा हा प्रकार आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये तफावत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. राजभाषेच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि संबंधित विभाग याप्रकरणी कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. स्वच्छतेसोबतच भाषेचा सन्मान राखला जाईल का.





