ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवी सुविधा
ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नवी सुविधा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवा पोर्टल mahaulb.in वर नगरपरिषदेतील सर्व मालमत्ता कराचा संपूर्ण डेटा यशस्वीरीत्या पोर्ट करण्यात आला असून, आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरता येणार आहे.
या नव्या सुविधेमुळे नागरिकांना कर भरण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही. डिजिटल प्रणालीमुळे वेळ आणि श्रमांची बचत होणार असून, पारदर्शकतेलाही चालना मिळणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने सर्व मिळकतधारकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
ऑनलाईन कर भरण्यासाठी नागरिकांनी प्रथम mahaulb.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर आपला मालमत्ता क्रमांक जाणून घ्या या पर्यायावर क्लिक करून तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडावी. पुढे गुलाबी देकावरील जुना मिळकत क्रमांक नमूद करून “शोधा” बटणावर क्लिक केल्यास नवीन मिळकत क्रमांक व थकबाकीचा तपशील स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर “Pay” या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून कराचा ऑनलाईन भरणा पूर्ण करता येईल.
नगरपरिषदेकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून मालमत्ता कर वेळेत भरावा आणि नगरपरिषदेच्या विकासकामांना सहकार्य करावे.
या उपक्रमामुळे तळेगाव दाभाडे शहर डिजिटल सेवांकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत असून, नागरिकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





