इंटरक्लास सोलो डान्स स्पर्धेत मधुरा शिरसट च्या प्रथम क्रमांक
इंटरक्लास सोलो डान्स स्पर्धेत मधुरा शिरसट च्या प्रथम क्रमांक
तळेगाव दाभाडे : शहरातील मनोहर नगर परिसरात कार्यरत असलेल्या मंगेश डान्स अकॅडमीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रंगतदार सादरीकरणे, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि उपस्थितांची दाद यामुळे कार्यक्रमाला विशेष उठाव मिळाला. उद्योजक भरत राजीवडे आणि विजय सरक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
स्नेहसंमेलनात इंटरक्लास सोलो परफॉर्मन्स स्पर्धा हे मुख्य आकर्षण ठरले. अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी स्वतः कोरिओग्राफी केलेल्या नृत्यांची प्रभावी मांडणी करत आपली कला सादर केली. विविध शैली, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचा संगम या सादरीकरणांतून पाहायला मिळाला. एकूण ३० विद्यार्थ्यांनी स्वरचित नृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत मधुरा शिरसट हिने उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सादरीकरणातील अचूकता, लयबद्धता आणि भावपूर्ण अभिव्यक्ती यामुळे परीक्षकांनी तिची विशेष दखल घेतली. धनश्री थोरात हिने द्वितीय तर वैभवी माळी हिने तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप उमटवली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह आणि गुलाबाचे फूल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोरिओग्राफर मंगेश साळुंखे यांनी प्रभावीपणे केले. अनिमेश भैसार, प्रशिक गवई आणि निखिल खलशे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी प्रत्येक सादरीकरणाचे बारकाईने परीक्षण करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.
मधुरा शिरसट हिच्या यशाबद्दल बोलताना कोरिओग्राफर मंगेश साळुंखे म्हणाले की, मधुरा ही अत्यंत मेहनती आणि समर्पित विद्यार्थीनी आहे. तिच्या सातत्यपूर्ण सरावामुळे आणि नव्या कल्पनांमुळे ती नेहमीच वेगळी ठरते. भविष्यात ती नृत्य क्षेत्रात मोठे यश संपादन करेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.
या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे. उपस्थितांनीही कार्यक्रमाचे कौतुक करत अकॅडमीच्या उपक्रमांचे स्वागत केले.






