पोलीसांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश; नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा
पोलीसांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश; नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा
नागपूर :
महाराष्ट्रातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी हेल्मेटचा सक्तीने वापर करावा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी दिले आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालय येथे आयोजित बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला असून, याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व आयुक्तालये व जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.
गेल्या दहा वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यावर धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात दरवर्षी होणाऱ्या प्राणांतिक व गंभीर दुखापतींच्या अपघातांपैकी सुमारे ३५ ते ४० टक्के अपघात दुचाकीस्वारांचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, हेल्मेटचा वापर केल्यास मृत्यू आणि गंभीर दुखापतींचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तरीदेखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हेल्मेट वापराबाबत अपेक्षित शिस्त दिसून येत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
विशेषतः मुंबई आणि नागपूर वगळता इतर शहरांमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, या दोन शहरांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक दुचाकीस्वार हेल्मेट वापरतात, तर इतर ठिकाणी हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. चिंतेची बाब म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही हेल्मेट वापरण्याचे प्रमाण समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ नुसार हेल्मेटचा वापर बंधनकारक असून, नियमांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, हेल्मेट न वापरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर आढळल्यास संबंधितांवर दंडासह शिस्तभंगाची नोंद सेवापुस्तकात केली जाणार आहे.
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रविण साळुंके यांनी दिलेल्या सूचनांनुसार, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात रस्ता सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.





