अक्षय तृतीया निमित्त श्री डोळसनाथ महाराजांचा चंदन उटी सोहळा
अक्षय तृतीया निमित्त श्री डोळसनाथ महाराजांचा चंदन उटी सोहळा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे चे जागृत ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात अक्षय तृतीया निमित्त रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परंपरेचा ठसा आणि श्रद्धेची साक्ष देणारा हा उत्सव यंदाही लोकसहभागातून रंगणार असून, भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
पहाटेच्या मंगलप्रहरात श्रींच्या अभिषेकाने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर महापूजा, चंदन उटी अशा पारंपरिक विधींनी वातावरण अधिक पवित्र होईल. त्यां नंतर रुद्रयागाच्या वेदघोषात भक्तिमय ऊर्जा संचारणार असून, भजन-कीर्तन, हरिपाठ, जप, नामस्मरण आणि कालभैरवाष्टक पठण यांसारख्या आध्यात्मिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांत दीपप्रज्वलन आणि श्रींची आरती यामुळे भक्तिभावाचा उत्कट आविष्कार अनुभवायला मिळणार आहे.
या धार्मिक सोहळ्यात आळंदी येथील प्रख्यात प्रवचनकार सोमनाथ महाराज भालेराव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या प्रवचनातून अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचा संगम साधला जाणार आहे. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाच्या भंडाऱ्याने होणार असून, सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव पूर्णतः लोकसहभागातून साजरा होत असल्याने गावकऱ्यांचा आणि भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या दात्यांनी ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाथभक्त संतोष वसंतराव भेगडे (पाटील) यांनी भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देणगीसाठी राजेश पिराजी सरोदे, यतीन सुरेशभाई शहा, अजय तुकाराम भेगडे आणि हेमंत शामराव दाभाडे यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
अक्षय तृतीयेच्या या पावन सोहळ्या च्या निमित्ताने आयोजित तळेगाव दाभाडे परिसरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती होणार असून, श्रद्धाळूंना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारा ठरणार आहे.





