मावळमध्ये १३ फूट अजगराचा थरारक बचाव; संयुक्त पथकाची धाडसी कामगिरी
मावळमध्ये १३ फूट अजगराचा थरारक बचाव; संयुक्त पथकाची धाडसी कामगिरी
पाथरगाव (मावळ) : जैवविविधतेच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या स्थानिक यंत्रणांनी पुन्हा एकदा संवेदनशीलता आणि तत्परतेचे दर्शन घडवत १३ फूट लांबीच्या अजगराला सुरक्षित जीवनदान दिले. पाथरगाव परिसरात आढळलेल्या या भव्य अजगराच्या बचावासाठी वाईल्डलाईफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ, वडगाव मावळ वन विभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने संयुक्त मोहीम राबवली.
सकाळच्या सुमारास स्थानिकांना शेताजवळ अजगर दिसून आल्यानंतर तत्काळ संबंधित यंत्रणांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने कोणतीही घाई न करता कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला जेरबंद केले. या मोहिमेत विशाल केदारी, अविनाश केदारी, दिनेश केदारी, नवनाथ केदारी, अजित नाणेकर आणि केतिका कसेतवार यांनी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
अजगर पकडल्यानंतर त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी जिगर सोलंकी, रौनक खरे आणि वनरक्षक महोरे यांनी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल निरीक्षण करण्यात आले. तपासणीत अजगर पूर्णतः निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला मानवी वस्त्यांपासून दूर, सुरक्षित जंगल परिसरात सोडण्यात आले.
भारतीय अजगर हा बिनविषारी साप असून तो स्वभावाने अत्यंत शांत आणि संथ असतो. मानवावर हल्ला करण्याची त्याची प्रवृत्ती नसते, मात्र शिकार पकडताना तो आपल्या भक्ष्याला घट्ट विळखा घालून गुदमरवतो. त्याच्या अंगावरील तपकिरी-पांढरट रंगसंगती आणि गडद डाग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. साधारणतः १० ते १५ फूटांपर्यंत वाढणारा हा साप शेळ्या, ससे, भेकर आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतो.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, शेतात काम करताना किंवा घराबाहेर वावरताना सतर्कता बाळगावी. अशा वन्य प्राण्यांना इजा न करता तात्काळ तज्ज्ञांना माहिती देणे हीच खरी जबाबदारी आहे.
ही यशस्वी मोहीम केवळ एका अजगराचे प्राण वाचवणारी ठरली नाही, तर मावळमधील पर्यावरण-जागरूकतेचा आणि सहजीवनाच्या मूल्यांचा प्रभावी संदेशही देऊन गेली.
![]()






