लोणावळ्यात व्हिला बुकिंग च्या ऑनलाइन जाळ्यात पर्यटकांची लूट
लोणावळ्यात व्हिला बुकिंग च्या ऑनलाइन जाळ्यात पर्यटकांची लूट
लोनावळा : सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले, धुक्याच्या दुलईत हरवलेले आणि हिरवाईच्या गालिच्याने सजलेले लोणावळा हे पर्यटनप्रेमींचे कायमचे आकर्षणस्थान. धबधब्यांच्या सरी, डोंगरकड्यांची रांगोळी आणि आल्हाददायक गारवा अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. मात्र या निसर्गरम्य स्थळावर सध्या डिजिटल जाळे टाकत भामट्यांनी पर्यटकांची आर्थिक लूट सुरू केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या सवयीचा गैरफायदा घेत ‘व्हिला बुकिंग स्कॅम’ने लोणावळ्यात डोके वर काढले आहे. आकर्षक छायाचित्रे, स्वस्त दरांची आमिषे आणि सोशल मीडियावर झळकणाऱ्या भडक जाहिरातींच्या माध्यमातून पर्यटकांना जाळ्यात ओढले जात आहे. अलीकडील घटनेत मुंबईतील एका पर्यटकाने ऑनलाईन व्हिला आरक्षित केला; मात्र प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यावर ‘व्हिला’ नावाचा कुठलाही पत्ता नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारात त्याची हजारो रुपयांची फसवणूक झाली.
फसवणुकीची पद्धतही अत्यंत चलाखीची आहे. सुरुवातीला आकर्षक फोटो पाठवले जातात, त्यानंतर विश्वास बसावा म्हणून बनावट लोकेशन शेअर केले जाते. बुकिंग निश्चित करण्याच्या नावाखाली २० ते २५ हजार रुपयांपर्यंत आगाऊ रक्कम उकळली जाते. पैसे मिळाल्यानंतर मात्र संपर्क तोडला जातो. परिणामी पर्यटक हतबल होऊन परतण्याशिवाय पर्याय राहत नाही.
या प्रकारामुळे केवळ पर्यटकांचे आर्थिक नुकसान होत नाही, तर लोणावळ्याच्या पर्यटन प्रतिमेलाही तडा जात असल्याची खंत स्थानिक व्यावसायिक व्यक्त करत आहेत. हे प्रकार बाहेरच्या भामट्यांकडून रचले जात असून त्याचा फटका स्थानिक उद्योगधंद्यांना बसत आहे, अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी दिली.
दरम्यान, अशा सायबर फसवणुकीपासून बचावासाठी सजगता हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पर्यटकांनी बुकिंग करताना केवळ अधिकृत आणि विश्वसनीय संकेतस्थळांचाच वापर करावा, व्यवहारापूर्वी माहितीची खातरजमा करावी, तसेच अनोळखी लिंक, संशयास्पद ऑफर आणि अतिशय स्वस्त दरांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
निसर्गाचा आनंद लुटताना डिजिटल सावधानता बाळगणेही तितकेच आवश्यक ठरत आहे, हेच या घटनांमधून अधोरेखित झाले आहे.





