‘मुलगी शिकली’चा अर्थ बदलतोय का? तळेगाव परिसरातील चिंताजनक वास्तव
‘मुलगी शिकली’चा अर्थ बदलतोय का?
तळेगाव परिसरातील चिंताजनक वास्तव
तळेगाव दाभाडे:
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हा संदेश समाजपरिवर्तनाचे प्रतीक मानला जातो. शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर बनवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य असला, तरी तळेगाव दाभाडे व परिसरात दिसणारी काही वास्तव चित्रे या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
तळेगाव परिसरात नामांकित महाविद्यालये, अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षणसंस्था मोठ्या प्रमाणावर असल्याने राज्यासह परराज्यातूनही विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने मुलींचा समावेश आहे. मात्र अलीकडील काळात काही सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनी सिगारेट ओढताना किंवा मद्यपान करताना आढळत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. हॉटेल परिसर, टपऱ्या, रेल्वे स्थानक आणि वसाहतींमध्ये अशी दृश्ये वाढत असल्याचे बोलले जात आहे.
पालक मोठ्या अपेक्षेने आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी घराबाहेर पाठवतात आणि नियमित खर्चासाठी पैसेही देतात. मात्र बदलत्या जीवनशैलीत पाल्यांच्या दैनंदिन सवयींवर नियंत्रण ठेवणे अनेक पालकांना शक्य होत नाही. परिणामी काही तरुणी व्यसनांच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, शिक्षणाच्या वयात लागलेली व्यसने आरोग्य आणि करिअर दोन्हीसाठी घातक ठरू शकतात.
खाजगी फ्लॅट्स, होस्टेल्स तसेच काही लॉजेसमध्ये नियमबाह्य प्रकार घडत असल्याच्या चर्चाही ऐकू येत आहेत. भाडेकरू गमावण्याच्या भीतीने अनेक जागामालक तक्रार टाळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिक कडक तपासणी करणे, शैक्षणिक संस्थांनी समुपदेशनावर भर देणे आणि पालक-समाजाने सजग राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ‘मुलगी शिकली’ ही संकल्पना केवळ घोषणापुरती न राहता जबाबदारी, शिस्त आणि खऱ्या अर्थाने प्रगतीकडे नेणारी ठरावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.





