राजकीय

मावळात भाजपची कोंडी? अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री–केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी साकडे


मावळात भाजपची कोंडी?

 

अल्प प्रतिसादामुळे मुख्यमंत्री–केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी साकडे

 

वडगाव मावळ – मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारं प्रचंड वेगाने वाहू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र, जमिनीवरचं वास्तव पाहिलं असता भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाढलेला जनकल यामुळे तालुक्यात राजकीय समीकरणं झपाट्याने बदलताना दिसत आहेत.

२०१९ ला सुनील शेळके जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तिथपासून ते २०२४ पर्यंत जी जनसामान्यांची कामे त्यांनी तत्परतेने केली त्या कामांच्या जोरावर ते २०२४ ला पुन्हा मावळचे आमदार म्हणून निवडून आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला एकटे आमदार सुनील शेळके, तर दुसऱ्या बाजूला भाजपसह जवळपास सर्वच पक्षांचा पाठिंबा असलेला अपक्ष उमेदवार असं समीकरण असतानाही शेळके यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामुळे मावळात शेळके यांचं राजकीय वारं किती जोरात आहे, हे अधोरेखित झालं.

जनसामान्य जनता केंद्रस्थानी ठेवून कार्यकर्त्यांमधला संघर्ष टाळावा आणि राज्यातील युती हि तालुक्यातही राहावी म्हणून मा. राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांना सोबत येण्याची विनंती तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडूणुकीत आमदार शेळके यांच्या वतीने करण्यात आले , सदरचा प्रस्ताव हा मा मुख्यमंत्री साहेब यांनी मान्य केला परंतु भाजप च्या स्थानिक नेत्यांनी त्या प्रस्तावात गौडबंगाल केला व आमदार शेळके यांना फसवले आणि सदरचा प्रस्ताव अमान्य करून आमदार शेळके यांनी केलेली लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत मधील राष्ट्रवादी ची एक हाती सत्ता आणि तळेगाव मधील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार १० हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणाची भविष्यवाणी खरी ठरवली.

याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा रोख थांबवण्यासाठी भाजपकडून वेगळीच रणनीती आखली जात असल्याचं दिसतंय. स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी आपलं म्हणणं ऐकत नसल्याचं लक्षात आल्यानंतर भाजपकडून थेट राज्य आणि केंद्रातील मोठ्या नेत्यांना प्रचारासाठी बोलावण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्र्यांना मावळात उतरवण्याची धडपड सुरू असल्याची चर्चा आहे.

राजकीय वर्तुळात मात्र या हालचालीकडे स्थानिक नेतृत्वाच्या अपयशाच्या नजरेने पाहिलं जात आहे. ‘कार्यकर्ते माझं ऐकतात, संघटना माझ्या हातात आहे,’ असा दावा करणाऱ्या बाळा भेगडे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जर स्थानिक पातळीवर संघटना सक्षम असती, तर जिल्हा परिषद–पंचायत समितीसारख्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांना पाचारण करण्याची वेळ आली नसती, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

याआधी लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीतही बाहेरून आलेले आमदार, राज्यमंत्री प्रचारासाठी येऊन गेले; मात्र नागरिकांनी त्याकडे फारसं लक्ष न देता सुनील शेळके यांना एकहाती सत्ता बहाल केली होती. तसंच चित्र पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसेल, या भीतीनेच भाजपकडून मोठ्या नेत्यांची फौज उतरवली जात असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे राष्ट्रवादीकडे वाढता जनसमर्थनाचा कल, तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद — या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून, भाजपला ‘अंजन’ दाखवणारा कौल मतदार देणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *