हातगाड्यांवर हातोडा ‘बड्यांवर’ मौन! तळेगावातील अतिक्रमण कारवाईत दुजाभाव उघड
हातगाड्यांवर हातोडा ‘बड्यांवर’ मौन!
तळेगावातील अतिक्रमण कारवाईत दुजाभाव उघड
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरातील लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक, तसेच जिजामाता चौक ते स्टेशन चौक हा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि ढिसाळ प्रशासनाचा जिवंत नमुना ठरत होता. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या हातगाड्या, टपऱ्या आणि फेरीवाल्यांमुळे मुख्य रस्ते अरुंद झाले होते. पादचाऱ्यांसाठी चालण्यास जागा उरलेली नव्हती, तर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
या गंभीर समस्येकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यानंतर अखेर तळेगाव नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. मात्र ही कारवाई सुरू होताच ‘गरीबांवर कोप आणि बड्यांवर मौन’ असा आरोप नागरिकांकडून जोर धरू लागला आहे. हातावर पोट असलेल्या फेरीवाल्यांचे हातगाडे उचलण्यात आले, टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या; मात्र मोठी हॉटेल्स, अनधिकृत बांधकामे आणि प्रभावशाली व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवले नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे नाना भालेराव कॉलनीसारख्या रहिवासी भागात नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले ‘हॉटेल ड्रीम लंच’ हे हॉटेल अनधिकृत असल्याचे उघड असतानाही त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाची सुई पालिका प्रशासनाकडे वळली आहे. रहिवासी झोनमध्ये व्यावसायिक वापरास मनाई असताना हे हॉटेल बिनधास्त सुरू आहे. तरीही ते पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
परिसरातील रहिवाशांच्या मते, अशा निवडक कारवाईमुळे ‘हप्तेखोरीमुळेच काही व्यावसायिक सुरक्षित आहेत का?’ अशी चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. गरीबांची गाडी लगेच दिसते, पण बड्या लोकांचे हॉटेल मात्र दिसत नाही, अशी बोचरी टीका नागरिक करत आहेत.
अतिक्रमण हटवणे हे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि शहराचे सौंदर्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, याबाबत नागरिकांचे दुमत नाही. मात्र कारवाई करताना समान न्यायाचा निकष लावणे अपेक्षित असताना, निवडक कारवाईमुळे नगर परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तळेगाव नगर परिषदेने लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर समान कारवाई करावी. ‘हॉटेल ड्रीम लंच’सह सर्व अनधिकृत व्यावसायिकांची चौकशी करावी आणि हप्तेखोरीच्या आरोपांबाबत स्पष्ट खुलासा करावा, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.





