कान्हे-खांडी सावळा रस्ता रुंदीकरणाला वेग बाधितांना मोबदल्याची मागणी तीव्र
कान्हे-खांडी सावळा रस्ता रुंदीकरणाला वेग बाधितांना मोबदल्याची मागणी तीव्र
वडगाव मावळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून ३.३३ कोटी रुपयांच्या निधीतून कान्हे-खांडी सावळा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग आला आहे. आंदर मावळच्या विकासरेषेला गती देणारा हा रस्ता ‘विकासधमनी’ ठरणार असल्याचे बोलले जात असतानाच, प्रशासकीय पूर्वतयारीतील उणिवांमुळे बाधितांमध्ये संभ्रमाचे सावट दाटले आहे.
रुंदीकरणाच्या आराखड्यात येणाऱ्या शेतजमिनी, घरकुल व टपऱ्यांबाबत संबंधितांना पूर्वसूचना देण्यात आली नसल्याची तक्रार पुढे आली आहे. शासकीय निकषांनुसार नुकसानभरपाई व योग्य मोबदला देणे अपेक्षित असताना याबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय जाहीर न झाल्याने शेतकरी, टपरीधारक आणि घरमालक यांच्यात अनिश्चिततेचा गोंधळ निर्माण झाला आहे.
रस्ता विकासाच्या या टप्प्याचे स्वागत करतानाच बाधितांना न्याय मिळावा, या भूमिकेतून तहसीलदार मावळ व सार्वजनिक बांधकाम उपअभियंता, वडगाव मावळ यांना निवेदन सादर करण्यात आले. नियमानुसार नुकसानभरपाई देऊन सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनंता हनुमंत पावशे, पंचायत समिती सदस्य आशा ज्ञानेश्वर मोरमारे, प्राची देवाभाऊ गायकवाड, नारायण बाबुराव ठाकर, राजेश बारकू कोकाटे, बाळासाहेब किसन दाते, नामदेवराव शेलार, अंकुश आंबेकर, नवनाथ ठाकर, बाळासाहेब पावशे, विक्रम हेमाडे, रविंद्र जानकर आदी उपस्थित होते.
या संदर्भात बोलताना नारायण ठाकर म्हणाले कि रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी, घरमालक व टपरीधारकांना शासनाच्या नियमांनुसार मोबदला मिळायलाच हवा. कोणतीही पूर्वसूचना न देता कामास सुरुवात होणे योग्य नाही. विकासकामांना आमचा ठाम पाठिंबा आहे मात्र विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांवर अन्याय होता कामा नये. प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करून बाधितांना न्याय द्यावा.
दरम्यान, विकासवेग आणि न्यायसंतुलन साधत प्रशासनाने पारदर्शक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.





