उर्मिलाताईं छाजेड यांना महिला कार्यगौरव पुरस्कार
उर्मिलाताईं छाजेड यांना महिला कार्यगौरव पुरस्कार
तळेगाव दाभाडे :
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाजकार्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित महिला सस्नेह मेळावा आणि महिला कार्यगौरव पुरस्कार सोहळा तळेगाव दाभाडे येथे उत्साहात पार पडला. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी मध्य महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने शनिवारी (दि.७ मार्च २०२६) हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत समाजघडणीत त्यांचे योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. समाजपरिवर्तनात महिलांची भूमिका, नेतृत्वगुण आणि बदल घडविण्याची त्यांची क्षमता यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करत उपस्थितांना प्रेरणादायी विचार दिले.
यावेळी समाजसेविका सौ. उर्मिलाताई भरतकुमार छाजेड यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करत त्यांना महिला कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत असतानाच त्यांनी स्वतःचा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय बाजूला ठेवत पूर्णवेळ समाजकार्याची वाट निवडली. महिलांना त्यांच्या हक्काचे माहेर’ मिळावे ही त्यांची जपलेली भावना आणि त्यातूनच संगोपन या संस्थेची स्थापना झाली.
संगोपन संस्थेच्या माध्यमातून माहेरची उणीव भासणाऱ्या विवाहित महिलांना काही दिवस माहेरचा स्नेह आणि मायेची ऊब मिळते. कोणत्याही वयाच्या विवाहित महिलांना येथे चार दिवस राहण्याची संधी दिली जाते. त्यांच्या पाठवणीची परंपरा देखील अगदी माहेरच्या घरासारखी जपली जाते. साडी-चोळी, ओटी आणि फळांचा वानवळा देत महिलांना सन्मानाने निरोप दिला जातो. या उपक्रमातून आजवर ५०० हून अधिक कुटुंबांचे संसार तुटण्यापासून वाचले असून समुपदेशनाद्वारे अनेक घरांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळेगाव दाभाडे येथील आनंदघर या वानप्रस्थाश्रमाच्या माध्यमातून उर्मिलाताईंनी ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातही मायेचा हात दिला आहे. सध्या येथे सुमारे ५० ज्येष्ठ नागरिक राहतात. घरच्यांकडून नाकारले गेलेले अनेक आजी-आजोबा येथे उर्मिलाताईंच्या मायेच्या छायेखाली आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहेत. त्यांच्या औषधोपचारांची जबाबदारीही त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतर नातलग उपलब्ध नसल्यास त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारीही त्या स्वतः पार पाडतात. त्यांच्या या सेवाभावाला उपस्थितांनी मानवतेचा जिवंत आदर्श असे संबोधले.
याशिवाय वंचित व आदिवासी मुलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी कलाश्रम या संस्थेद्वारेही त्या कार्यरत आहेत. या उपक्रमातून मुलांना शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वास देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक मुलांच्या आयुष्यात या कार्यामुळे सकारात्मक बदल घडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महिला सस्नेह मेळाव्यात विविध संवाद सत्रे, अनुभवकथन आणि परस्पर चर्चा यांमधून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि परस्पर स्नेहाची भावना या मेळाव्यातून अधिक दृढ झाल्याचे अनेकांनी सांगितले.
महिला दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम समाजातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला मानाचा मुजरा ठरत नव्या पिढीसाठी प्रेरणेचा दीप ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





